मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...

YT
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

महाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एकत्रित झाला ते नि

महाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एकत्रित झाला ते निमित्त म्हणजे "मराठा मोर्चा." 

या मोर्चातील शिस्त, गर्दी यावर बराच कौतुकाचा वर्षाव झाला आहेच जो यथायोग्यही आहे. परंतु नेत्रदिपक गर्दी आणि कौतुकाच्या वर्षावात या सगळ्या घडामोडींचा शांतपणे आढावा घेणेही आवश्यक आहे. 

सोशल मिडीया नावाचे साधन आपल्या हातात आल्यापासून सामान्य नागरिक आपापल्या परीने लेख,बातम्या,माहिती यांचा वर्षाव एकमेकांवर करत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकचा वापर ज्याला जशी बुद्धी आणि इच्छा तो त्याप्रमाणे यथाशक्ति करत आहे. या सगळ्या digital परिस्थितीचे निरीक्षण केल्यावर सध्या आपल्या पुढे येणारी सर्वात मोठी गंभीर समस्या म्हणजे गावाच्या चावडीपुरती दबकत चालणारी जातियता digital साधनं वापरत समाजात जोमाने हातपाय पसरू लागली आहे. 

यामागच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे गेल्या दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्या गावीदेखील नसलेले दिनविशेष, तिथी, शुभेच्छा यांचा चौफेर मारा आपल्यावर सुरू आहे. गेल्या काही वर्षांतच आपल्या सगळ्यांना इतिहास आणि त्यातील पात्रांविषयी जरा जास्तच उमाळा दाटून आला आहे. त्या उमाळ्यापोटी कोण अधिक कट्टर मराठा, बौद्ध, ब्राह्मण, धनगर याच्या स्पर्धा सुरु आहेत आणि वेगवेगळ्या अस्मिता व संघर्षाचे पेव फुटले आहे.

काही काळापुर्वी नगर येथे कौंटूबिक वादातून घडलेल्या हत्याकांडाचे वृत्तांकन काही वृत्तपत्रं आणि वाहिन्यांवर 'दलित हत्याकांड' अशी झाल्यावर आंबेडकरी समाजात रोष उफाळून आला. महाराष्ट्रभर याच्या विरोधात गर्दी जमवून मोर्चे निघाले, निषेध व्यक्त केले गेले. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी होतीच पण मोर्चातील गर्दी पाहून दर्दी होणाऱ्या राजकारण्यांकडून वेळोवेळी केले जाणारे अल्पसंख्याकांचे लांगूलचालन (?) आणि अॅट्रोसीटी कायद्याच्या काही ठिकाणी घडलेल्या गैरवापरामुळे याविषयी रोष बाळगून असलेल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या रोषाला ठिणगी देणारी ठरली.

या ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले ते कोपर्डी येथे झालेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर. योगायोगाने सदर घटनेतील आरोपी मागासवर्गीय समाजातील होते. सुरवातीला ही बातमी मुख्य धारेतील मिडीयाकडून पुरेसे वृत्तांकन न मिळालेली असली तरी फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रसारित झाली. सरकार, प्रसारमाध्यमं घटना दाबण्याचा प्रयत्न करत आहे हा आरोप करत त्याच्या निषेधार्थ म्हणून पहिला मराठा मोर्चा निघाला. पुढे या मोर्चाने व्यापक रूप धारण केले व अखेर तो प्रवास परवाच्या मुंबईतील अतिविराट अशा मोर्चा पर्यंत येऊन थांबला. मोर्चाच्या या प्रवासात "कोपर्डी घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे" ही प्रमुख मागणी स्वतःला अनेक डबे जोडत "अॅट्रोसीटी कायद्यात बदल ते मराठ्यांना आरक्षण" अशा आणखी काही मागण्यांच्या अंतिम स्वरुपात सर्वांच्या समोर कधी व कशी आली ते कुणालाच कळले नाही.

हे सगळे पाहिल्यावर एक मराठा म्हणून मला काही मांडावे वाटते; कारण एक कुलकर्णी किंवा एक कांबळे मराठा मोर्चाविषयी त्याचं मत मांडू लागला तर त्यांचा आवाज ते परजातिय असल्यामुळे आधीच दाबला जाईल. सध्याच्या पुरोगामी महाराष्ट्रात एखाद्या विषयावर बोलण्यासाठी आधी त्या जाती धर्माचा असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. 

माझ्या मराठा बांधवांनो आपल्याला हवे असलेले आरक्षण, अॅट्रोसीटी कायद्यामध्ये बदल या व इतर मागण्या किती योग्य आणि किती शक्य यावर अनेक तज्ञ मंडळी त्यांचे मत प्रदर्शित करत आहेतच परंतु आपण कुठेतरी शांत बसून सध्याच्या या सगळ्याच घडामोडींवर विचार केला पाहिजे आणि आपणच केला पाहिजे 

संबंधित बातम्या