भाषा असावी , तर अशी असावी

संदीप कांबळे
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

माय मराठी, साद मराठी..!

लाभले आम्हांस भाग्य
बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य
ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक
जाणतो मराठी
एवढ्या जगात माय
मानतो मराठी..!

प्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या ह्या कवितेतील ओळी कोणत्याही मराठी भाषकाला स्फुरण चढवणाऱ्या आहेत. कारण मुळात मराठी भाषा ही सुसंस्कारीत भाषा आहे. या भाषेतून ज्यांनी शिक्षणाचे बाळकडू प्यायले आहे, ते जीवनात यशस्वी झालेले आहेत. इंग्रजी भाषेचा अतिरेक वाढला असला तरी तो केवळ व्यवहारीक आहे.

इंग्रजी भाषेत सुसंस्काराचा अभाव जाणवत असल्याने सर्वच ठिकाणी ही भाषा उपयोगाची ठरत नाही. म्हणूनच मराठी भाषेचे महत्त्व अनेक वर्षांपासून टिकून आहे, पटते आहे. मराठी भाषेचा उगम हा उत्तरेकडे झाला असल्याचे अनेक लेखकांचे म्हणणे आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला आहे.

संत ज्ञानेश्र्वरांनी केवळ मराठी भाषेला प्रकाशात आणले असे नव्हे, तर त्यांनी ही भाषा फुलावी यासाठी त्यांचे साहित्य आजही उपयोगी ठरते. ‘परि अृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।’ अशा शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गोडवा व्यक्त केला आहे, तो अन्य भाषांत आढळून येत नाही. भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरी व भावार्थ दीपिका या उच्च दर्जाच्या ग्रंथांचे लेखनही मराठीत झाल्याने मराठी भाषेची उंची महान असल्याचे स्पष्ट होते.

त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून खऱ्या अर्थाने पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली. महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्याचा गोडवा दिसून येत असल्याचे प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. वंदना भानप यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
संत एकनाथांनी ‘भागवत’ ग्रंथाची रचना करून मराठीचा दर्जा वाढविण्यात भर घातली.यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे १३ व्या शतकातील मराठी भाषा ही आजच्या वाचकालाही तितकीच आपली व जवळची वाटते.

इतिहासातही मराठीला अनन्य साधारण महत्त्व होते, हे अनेक उदाहरणावरून स्पष्ट होते. इ. स. १२५० ते १३५० या काळात यादवांची सत्ता होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सत्तेचा कालखंड दिसतो. या कालखंडात मराठी भाषेचाही उपयोग होत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात राजकीय पत्रव्यहार, बखरी लिहिण्यासाठी मराठीचा वापर झाला आहे. ‘मराठी रुमाल’ किंवा ‘पेशव दफ्तर’ या सारख्या संग्रहातून मराठी पत्रांचा समावेश करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मराठी भाषेचेही रक्षण झालेले आहे. त्यामुळेच
कवी कुसुमाग्रज लिहितात -

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या
दऱ्या-खोऱ्यातील शिळा
हिच्या कुशीत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्गम विराने
केली मृत्यूवर मात
नाही पसरला कर कधी
मागायास दान
स्वर्ण सिंहासनापुढे कधी
लवली ना मान..!

या कवितेतून कवी कुसुमाग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या तेजाचा गौरव करताना मराठी भाषेची महतीही व्यक्त केली आहे. मराठी भाषेच्या योगदानामध्ये शाहिरांचाही मोठा वाटा आहे. शाहिरांच्या कविता हे मराठी कवितेचे एक भूषण आहे आणि त्याचे उदाहरण म्हणजेच ‘पोवाडा’ हे होय. शाहिरांचे पोवाडे आजही अस्सल मराठीतूनच सादर होताना आपण पाहत आहोत. थोर मराठी साहित्यिकांनी आपल्यापरीने मराठी भाषेसाठी केलेले अतुलनीय कार्य हे मराठी भाषेचे संरक्षण कवच ठरत आले आहे. त्यात वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, कवी कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके यांसारख्या साहित्यिकांची नावे पुढे येतात.

सध्या इंग्रजीचे स्तोम वाढत असले तरी मराठी हाच सुसंस्कारीत शिक्षणाचा पाया आहे. तरीही काही पालक इंग्रजीच्या ‘भुलभुलैय्या’त गुरफटले जात असून, इंग्रजीचा वाढता वापर करताना दिसत आहेत. येणाऱ्या काळ हा मराठीसाठी महत्त्वाचा असल्याने बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तरच मराठीचे सौंदर्य टिकणार आहे आणि हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.
शेवटी जाता-जाता एकच सांगावेसे वाटते -

माय मराठी, साद मराठी
भाषांचा भावार्थ मराठी
बोल मराठी, साथ मराठी
जगण्यासा या अर्थ मराठी...!

संबंधित बातम्या