तेरेखोल रेती उपसा कारवाई मागणी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

आरोंदा खाडीपात्रात वाळू माफियांचा मोर्चा

आरोंदा मच्छीमार संस्थेकडून गोवा, महाराष्ट्र सरकारने कारवाई करण्याची मागणी

गोवा व महाराष्ट्र सरकारने संयुक्तरित्या या वाळू चोरी माफियांवर कारवाई करून आरोंदा भागातील मच्छीमार बांधवाना दिलासा द्यावा, अशी मागणी आरोंदा मच्छीमार संस्थेने केली आहे.

तेरेखोल : रेती उपशावर लादलेल्या निर्बंधामुळे गोव्यातील रेती व्यावसायिकांनी आपला मोर्चा महाराष्ट्राच्या हद्दीत येणाऱ्या आरोंदा किनाऱ्यावर वळविला आहे. रात्रीच्यावेळी गोव्यातील वाळू व्यावसायिकांकडून आरोंदा - तेरेखोल खाडीपात्रात बंदी आदेश झुगारून वाळूची बेकायदेशीरपणे चोरी केली जात आहे.

तेरेखोल खाडीपात्रात आरोंदा किनारी भागात रात्रीच्यावेळी बेकायदेशीरपणे वाळू उपसा केला जात आहे. महाराष्ट्र व गोव्यात रेती उपसा करण्यास बंदी असताना बंदी आदेश झुगारून रात्री बेरात्री चोरट्या पद्धतीने गोव्याच्या बाजूने येऊन वाळू उपसा केला जात आहे. तेरेखोल खाडीपात्राच्या आरोंदा किनारी भागात स्थानिक मच्छीमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. मासेमारीचा हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला असून येथील मच्छीमारी पिढ्यानपिढ्या बारमाही चालू असते, अशी माहिती आरोंदा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष गोकुळदास विठोबा मोटे यांनी स्थानिक पत्रकारांना दिली.

तेरेखोल खाडीपात्रात ज्या ठिकाणी वाळू काढली जाते त्या ठिकाणी ओळखीसाठी बांबू पुरला जातो किंवा नांगर टाकला जातो. त्यामुळे मच्छीमारी करताना बांबू व नांगराला लागून मासेमारीची जाळी फाटली जातात व आम्हाला नुकसान सोसावे लागते. रेती उपसा करणारे कामगार हे परप्रांतीय आहेत. आम्ही त्यांना प्रत्येकवेळी हटकतो त्या-त्या वेळी आमच्या मालकाने आम्हाला वाळू काढण्यास सांगितल्याचे ते सांगतात. या वाळू चोरीमुळे आम्हा स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची पाळी येत आहे, असे स्थानिक मच्छीमार बांधव मोटे यांनी माहिती देताना सांगितले.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये गोवा सरकारकडून तेरेखोल खाडीपात्रात वाळू काढण्यास बंदी आणल्याने सरकारला जाग आली आहे. महाराष्ट्र सरकारला जे जमले नाही ते गोवा सरकारने करून दाखवल्याचे आम्हाला वाटत होते व या निर्णयाच्या समर्थनार्थ आम्ही गोवा सरकारचे अभनंदन करण्याचा निर्णय घेतला परंतु गोव्याच्या हद्दीतून महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन वाळू उपसा करण्‍याचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याने गोवा सरकारची ही बोलाची कढी आणि बोलाचाच भात असल्याचे कळून चुकले.

हेही वाचा  : प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण

या प्रकारांना आळा बसावा यासाठी महाराष्ट्र सरकारला आम्ही यापूर्वी निवेदन सादर केलेली आहेत. गोवा सरकारकडून याची तत्काळ दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे. गोव्यातील वाळू व्यावसायिकांकडून तेरेखोल खाडीत आरोंदा किनारी भागात येऊन रात्रीच्यावेळी बेकायदेशीरपणे वाळू उपसा करण्याचे प्रकार त्वरित रोखावेत व आम्हा येथील स्थानिक मच्छीमार बांधवाना दिलासा द्यावा, अशी मागणी आरोंदा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष गोकुळदास मोटे यांनी प्रतिनिधीकडे बोलताना व्‍यक्‍त केली आहे.

संबंधित बातम्या