यांना मिळाला कचरा प्रकल्पाचा ताबा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

सोनसोडो कचरा प्रकल्पाचा
ताबा मडगाव पालिकेने घेतला .

कचरा प्रकल्पाचा ताबा मडगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे देताना फोमेंतोचे अधिकारी.

नावेली : सोनसोडो येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा ताबा मडगाव पालिकेने फोमेंतो ग्रीन कंपनीकडून गुरुवारी ताब्यात घेतला, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी दिली. सोनसोडो प्रकल्पासंबधात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सोनसोड्यावरील पुढील कृती संबधात निर्णय घेण्यात येणार असल्याचे पंचवाडकर यांनी सांगितले. सोनसोड्यावरील सर्व चाव्या फोमेंतोच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या ताब्यात दिल्या.

दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात सांगितल्याप्रमाणे फोमेंतो कंपनी सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्प पालिकेच्या ताब्यात देण्यास तयार असल्याचे सांगितले होते, त्या संबधात कंपनीने पालिकेशी पत्रव्यवहार केला होता. न्यायालयाने १३ फेब्रुवारी रोजी पालिकेला सात दिवसांच्या आत प्रकल्प हस्तातरणाचा निर्णय घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे सात दिवसाची मुदत संपल्यानंतर पालिकेचे सफाई विभाग निरीक्षक विराज आराबेकर व विशांत नाईक यांनी कचरा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. पालिकेने प्रकल्प हस्तांतरणासाठी पाच अभियंत्यांची समिती स्थापन केली. या समितीत पालिका मुख्य अभियंता दिनीज डिमेलो, प्रशांत नार्वेकर, विशांत नाईक, सज्जन गावकर, रोहीत गावकर यांचा समितीत समावेश होता. या समितीने प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पाडली.

फोमेंतो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचा ताबा मडगाव पालिकेला दिल्याने आता सोनसोड्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम कशा पद्धतीने पुढे नेता येईल यासंबधी निर्णय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे पालिका मुख्याधिकारी पंचवाडकर यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या