टाळेबंदी'मुळे शुभकार्ये लांबली

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

नोंदणीसाठी रोज कार्यालयात नववधू-वरांसह साक्षीदार यांची ये-जा चालू असल्याचे दिसून येत आहे. 'कोरोना'चे (कोविड-१९) संकट टाळण्यासाठी 'टाळेबंदी' लागू झाल्यानंतर उत्सव, गर्दीचे सोहळे आदी शुभकार्यांवर मर्यादा आल्या आहेत.

तुकाराम सावंत

डिचोली

 यंदा लग्नासारख्या शुभकार्यात 'कोरोना'चे विघ्न आडवे आले असून,'टाळेबंदी'मुळे डिचोलीतील विविध भागात ठरलेले बहूतेक सर्व विवाहसोहळे लांबणीवर पडले आहेत. 'कोरोना'चे (कोविड-१९) ओढवलेले संकट आणि निर्माण झालेल्या अडचणी ओळखून ठरलेले विवाहसोहळे स्थगित करुन ते पुढे ढकलण्याचा निर्णय वधू-वर मंडळींकडून घेण्यात आला आहे. लग्नकार्ये लांबणीवर पडली असली, तरी सध्या विवाह नोंदणी कायद्यांतर्गत मात्र विवाह नोंदणीची लगबग चालू असल्याचे दिसून येत आहे. जवळपास महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अन्य सरकारी कार्यालयांसह नागरी आणि उप निबंधक कार्यालय सुरु झाल्यानंतर डिचोलीत आता विवाह नोंदणी कायद्यांतर्गत विवाह नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. 'लॉकडाऊन'मुळे उप निबंधक कार्यालय बंद राहिल्याने लांबणीवर पडलेल्या विवाह नोंदणी कायद्यांतर्गतच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील नोंदणीबरोबरच नव्याने नोंदणीची प्रक्रियाही सुरु झाली आहे. नोंदणीसाठी रोज कार्यालयात नववधू-वरांसह साक्षीदार यांची ये-जा चालू असल्याचे दिसून येत आहे. 'कोरोना'चे (कोविड-१९) संकट टाळण्यासाठी 'टाळेबंदी' लागू झाल्यानंतर उत्सव, गर्दीचे सोहळे आदी शुभकार्यांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या लग्नसराईच्या मोसमात एप्रिलपासून ठरलेले विवाहसोहळे स्थगित करण्यात आले आहेत. स्थगित विवाह सोहळ्यांचा पावसाळ्यानंतर विचार होण्याची शक्‍यता असली, तरी सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शुभकार्याशी संबंधित व्यवसायिक आदी घटकही अडचणीत आले आहेत.

लांब राहण्याची पाळी
विवाहकार्ये लांबणीवर पडल्याने कधी एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढायला मिळते आणि शुभमंगल सावधान होते, याची घाई लागलेल्या आणि भावी संसाराची सवप्ने उराशी बाळगलेल्या नववधू-वरांचा सध्या भ्रमनिरास झाला आहे. त्यातल्या त्यात आता विवाह नोंदणी कतानाही नववधू-वरांना कटु अनुभव येत आहे. 'टाळेबंदी'मुळे सामाजिक अंतराचे पालन करावे लागत असल्याने नोंदणी करतानाही वधू-वरांना लांबच रहावे लागत आहे. उपनिबंधक कार्यालयात सध्या या गोष्टीचा प्रत्यय येत आहे. विवाह नोंदणीवेळी नववधू-वरांसमवेत येणाऱ्या त्यांच्या नातलगांना तर कार्यालयाबाहेरच थांबावे लागत आहे.

संबंधित बातम्या