कोरोनाचे ‘मास्‍क’ही बनले फॅशनेबल!

Dainik Gomantak
मंगळवार, 21 एप्रिल 2020

कोरोनाचे ‘मास्‍क’ही बनले फॅशनेबल! 

पणजी,

‘कोरोना’पासूनच्‍या बचावासाठी मास्‍कची सर्वांनाच सक्ती केली आहे. मात्र, काही लोकांनी या मास्‍कलाही फॅशनचे रूप दिले आहे. जवळ असेल त्‍या आणि आवडेल त्‍या कपड्याचे रुपांतर मास्‍कमध्‍ये केले आहे. सुरक्षेच्‍या दृष्‍टिकोनातून हे घातक ठरू शकते. केवळ सेल्‍फी आणि फॅशनच्‍या मोहापायी मास्‍कचा वापर न होता तो सुरक्षेसाठी व्‍हावा. घरी मास्‍क बनविण्‍यासाठी सरकारने प्रवृत्त केले, तरी यासंदर्भात असणाऱ्या मार्गदर्शक तत्त्‍वांचेही पालन होणे आवश्‍‍यक आहे.
अनेकजण मास्‍कचा वापर त्‍यांच्‍या कपड्यांच्‍या रंगसंगतीनुसार करतात, तर काहीजण घरच्‍या घरी बसल्‍या भविष्‍यात वापरता यावेत म्‍हणून असेल त्‍या कपड्याचा वापर करीत आहेत. काहीजणांनी तर ‘अपना टाइम आयेगा, हम नही सुधरेंगे’ यासारखे अनेक संदेश मास्‍कवर लिहिले आहेत. काहींनी तर मास्‍क तयार करण्‍यासाठी जुन्‍या जीन्‍सचा वापर केला. याबाबतचे व्‍हिडीओ आणि फोटो माहितीसह फेसबुक, इंस्‍टाग्राम यासारख्‍या सोशल मीडियावर टाकून माहितीही दिली जात आहे. सोशल मीडियावर मास्‍कसह सॅनिटायझरचा वापर केल्‍याचाही व्‍हिडीओ अपलोड केला जात आहे. तसेच अनेकजण यावरून विनोद, गाणी रेकॉर्डिंग करून टाळेबंदीच्‍या काळात टाइमपास करताना दिसून येत आहेत. काही महिला तर साडी, ओढण्‍या यासारख्‍या गोष्‍टींचा वापर मास्‍क तयार करण्‍यासाठी करीत आहेत.

मार्गदर्शक तत्‍वे पाळा
जागतिक आरोग्‍य संघटनेने दिलेल्‍या माहितीनुसार, बाजारात मिळणारे मास्‍क एकदा वापरले की परत न वापरता त्‍यांची योग्‍य विल्‍हेवाट लावायला हवी. महाराष्‍ट्रासारख्‍या अनेक राज्‍यांमध्‍ये माहिती तंत्रज्ञानासारख्‍या विभागांकडून मास्‍क बनविण्‍याबाबत मार्गदर्शक ऑनलाइन पुस्‍तिका देण्‍यात आल्‍या आहेत. तसेच मास्‍कसाठी वापरले जाणारे कापड जाळीचे, नायलॉनचे न वापरता कॉटनचे असावे, असेही मार्गदर्शक तत्त्‍वे सांगतात.

महिला बचत गट मास्‍कच्‍या कामात व्‍यस्‍त
राज्‍यातील बचत गटातील महिला कॉटनच्‍या कापडापासून तीन ते चार लाख मास्‍क बनविण्‍यात व्‍यस्‍त आहेत. आरोग्‍य खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार गोमंतकीयांनी या मास्‍कचा वापर करावा. आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजित राणे व विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत हेसुद्धा कापडापासून बनविलेल्‍या मास्‍कचा वापर करीत असल्‍याची माहिती समाजमाध्‍यमांवर दिली आहे.

संबंधित बातम्या