कुंकळ्ळी बनतेय वैद्यकीय कचऱ्याचे डपिंग ग्रांउड

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पोयतोमांडो वेरोडा येथील रानात काही दिवसांपूर्वी एका खासगी इस्पितळाचा वैद्यकीय कचरा टाकल्याची घटना उघडकीस आली होती. हा कचरा टाकनाऱ्याचा तपास करण्यात स्थानिक पालिका मंडळ व पोलिसांनाही यश आलेले नाही.

कुंकळ्ळी : कुंकळ्ळीवासीय सध्या बाहेरून येणाऱ्या घातक वैद्यकीय कचऱ्याने व कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत साठविलेल्या घातक रासायनिक कचऱ्याने त्रस्त झालेले असून कुंकळ्ळी हे घातक कचऱ्याचा डम्पिंग ग्रांउड बनत आहे.

काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा घातक कचरा कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत फेकला होता. काही महिन्यापूर्वी आंबावलीत असाच घातक कचरा टाकण्याची घटना घडली होती. अशाप्रकारे वैद्यकीय कचरा टाकण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. हा कचरा कोठून येतो, हे कोडे अजून उलगडलेले नसून यामुळे कुंकळ्ळीवासीय त्रस्त आहेत.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत हजारो टन घातक रासायनिक कचरा साठवून ठेवण्यात आलेला आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून साठविलेल्या घातक रासायनिक कचऱ्यामुळे कुंकळ्ळीचे मोठे नुकसान झालेले आहे. येथील पाण्याचे स्रोत प्रदूषित झालेले आहेत. शेत जमिनीत रासायनिक द्रव्य गेल्यामुळे शेतजमीन निपिक बनली आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील घातक रासायनिक कारखाने बंद पडले असून घातक कचरा मात्र, तिथेच पडून राहिलेला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे धाडस कारखानदार व सरकार दाखवत नाही.

कुंकळ्ळी नगरपालिका मंडळाने पालिका क्षेत्रातील कचरा गोळा करण्यासाठी व कचरा विल्हेवाट लावण्याची योजना राबवली आहे. पालिका घरोघरी कचरा गोळा करते कचरा वेगळा करून घेण्याची पद्धत ही येथे राबविण्यात येत आहे. कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करण्यासाठी पालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. शिवाय प्लास्टिक कचरा व इतर सुका कचरा वर्गिकर करण्याची प्रक्रिया येथे राबविण्यात येत असली तरी बाहेरून येणाऱ्या घातक वैद्यकीय कचऱ्याची समस्या तीव्र बनली आहे. या समस्येवर उपाय काढण्याची गरज आहे.

हल्लीच हरित लवादाने राज्यातील पालिका कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत नाही. कचरा वेगळा करीत नसल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहे. अशा बाहेरून येणाऱ्या कचऱ्यावर उपाययोजना आखणे मोठे आव्हान आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करू नये

वैद्यकीय कचऱ्याचे होते काय?
राज्यातील खासगी, सरकारी इस्पितळे व दवाखान्यातील वैद्यकीय कचऱ्यावर कशी प्रक्रिया करावी, यावर मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत. वैद्यकीय कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची गरज आहे. मात्र, खासगी व सरकारी इस्पितळातील कचरा जातो, कुठे यावर प्रक्रिया कोठे केली जाते, याचा तपशील व माहिती ठेवण्याची यंत्रणाच नसल्याचे कळते. सरकारने खासगी व सरकारी इस्पितळाचा कचऱ्यावर विल्हेवाट कशी लागते याची माहिती घेणे गरजेचे असून सरकारने अशी यंत्रणा सुरू केल्यास उघड्यावर कचरा टाकण्याच्या प्रकारावर आळा बसणे शक्य आहे.

 

संबंधित बातम्या