दरवर्षी ११ हजार कोटींच्या औषधांची निर्यात

Dainik Gomantak
शनिवार, 18 एप्रिल 2020

दरवर्षी ११ हजार कोटींच्या औषधांची निर्यात 

सुदेश आर्लेकर,
म्हापसा, 

भारतभर उत्पादन होणाऱ्या औषधांपैकी सुमारे अकरा टक्‍के उत्पादन छोट्याशा गोवा राज्यात होत असते व गोव्यात उत्पादित होणाऱ्या औषधांपैकी सुमारे ऐंशी टक्‍के माल जगभरात निर्यात केला जातो, तर वीस टक्‍के उत्पादनांची देशभरात विक्री होत असते. गोव्यातून प्रतिवर्ष अकरा हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात केली जाते.
क्षेत्रफळाचा विचार केल्यास गोव्यातील औषधनिर्मिती राष्ट्रीय स्तरावर अव्वलस्थानी असल्याचे स्पष्ट होते. दर्जात्मकतेच्या बाबतीत ‘फार्मा हब’च्या यादीत गोव्याने राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त केला आहे. गोव्यात सध्या कार्यरत असलेल्या सुमारे ऐंशी फार्मास्युटिकल युनिट्‌समधून दरवर्षी सुमारे चौदा हजार कोटींची उत्पादने तयार केली जातात. त्यापैकी प्रतिवर्ष अकरा हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात केली जाते आणि अन्य उत्पादने भारतात विकली जातात. सध्या गोवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा हब झालेला आहे. फार्मा उद्योग हा मनुष्यबळप्रधान उद्योग असून, त्यात कायमस्वरूपी काणि कंत्राटी अशा दोन्ही पद्धतींच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्‍यक असते. सध्या गोव्यात या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ तसेच पदवीधर उपलब्ध आहेत.

दर्जेदार उत्‍पादनांमुळे निर्यातवृद्धी
जागतिक दर्जा सांभाळला जात असल्यानेच गोव्याला मोठ्या प्रमाणात निर्यात करणे शक्‍य होते, असे स्पष्ट होते. गोव्यात सध्या सुमारे ऐशी परवानाप्राप्त औषधनिर्मिती युनिट्‌स कार्यरत आहेत. गोव्यात विमानतळ, सागरी पोर्ट अशा सुविधा चांगल्यापैकी उपलब्ध असल्याने तसेच शासकीय पाठबळामुळे निर्यातीला अधिकाधिक चालना प्राप्त होत असते. सिप्ला, कॅन्डिला, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स, युनिकॅम लॅब, एफडीसी, इंडिको रेमेडिज इत्यादी भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांनी गोव्यात युनिट्‌स स्थापण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय, काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही गुंतवणूक केली आहे.

संबंधित बातम्या