काँग्रेस पक्षाला नक्कीच चांगले दिवस येणार : गिरीश चोडणकर

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

मरगळ झटकून जोमाने कामाला लागा : सांगेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

युवक काँग्रेसच्‍या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर.

सांगे : सांगे भागात असून कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे. आजच्या बैठकीतील उपस्थित पाहता काँग्रेस पक्ष जोमाने कार्यरत झाल्याचे समाधान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नेत्रावळी सांगे येथील दूध सोसायटी सभागृहात युवक काँग्रेसच्या बैठकीला मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, अभिजित देसाई, जुसेपिन रॉड्रिगीस, रजनीकांत नाईक, शेख अली, ज्योकी डिकॉस्ता, चंदा वेळीप, प्रकाश भगत, विठ्ठल गावकर, संतोष नाईक यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना चोडणकर म्हणाले, सांगे हा शेतीप्रधान भाग आहे. तरीही राज्‍यातील एकमेव साखर कारखाना बंद पडला. राजरोसपणे अभयारण्य परिसरातील जनावरे भर वस्तीत फिरून लोकांना हानी करू लागली. शेता, भाताची नासाडी होत असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. अशा विषयावर सांगेतील युवक काँग्रेसने संघटितपणे आवाज उठवावा, असे आवाहन करीत सांगे भागात काँग्रेस पक्ष गत लोकसभा निवडणुकीपासून बळकटी घेऊ लागला आहे. त्याबद्दल सर्व कार्यकर्ते अभिनंदनास पात्र असल्याचे सांगितले.

युवक काँग्रेस गोवा प्रदेश अध्यक्ष वरद म्हार्दोळकर म्हणाले की, युवक काँग्रेस ही ताकत आहे. राजकीय स्वार्थासाठी कोणीही इकडून तिकडे उड्या मारल्या, तरी त्याचा काँग्रेस पक्षावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. ‘गेले ते फुटीर’ मात्र मतदार काँग्रेस पक्षात राहिले. अशा लोकांना धडा शिकविण्यास कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याचे आवाहन केले.

अभिजित देसाई यांनी सांगे मतदार संघाने आतापर्यंत भाजपासाठी आमदार दिले. त्यांचे खरे योगदान नेत्रावळी गावाला जात आहे. पण, विकास आणि नोकरी देताना नेत्रावळीचा विसर पडत आहे. यापुढे नेत्रावळीतील जनता फसणार नसून योग्य तो धडा शिकविणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शेख आली, रजनीकांत नाईक व इतर जणांनी आपले विचार मांडले. बैठकीला दीडशेपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या