म्‍हादई नदीला ग्रासले प्रदूषणाने

Dainik Gomantak
गुरुवार, 9 जानेवारी 2020

म्हादईचा उगम कर्नाटकातील भीमगड परिसरात ३० झऱ्यांतून होतो. खांडेपार, वाळवंटी, डिचोली, अस्नोडा, सिकेरी व म्हापसा या म्हादईच्या उपनद्या आहेत.

अवित बगळे

पणजी

म्हादई वाचवा यासाठी प्रत्‍येकजण कंबर कसत आहे. राजकीय धृवीकरणही या विषयावरून होऊ लागले आहे. असे असतानाच म्हादई म्हणजे मांडवी नदीला प्रदूषणाने ग्रासले असल्याची बाब समोर आली आहे. सरकारी यंत्रणांनी केलेल्या पाहणीत ही बाब ठळकपणे मांडण्यात आली आहे. आता राष्ट्रीय हरित लवादाच्या सुचनेनुसार मांडवी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा आराखडाही तयार करण्यात येत आहे.

पाच ठिकाणी उभारली तपासयंत्रणा
राज्याच्या पर्यावरण खात्याने यासाठी पुढाकार घेतला आहे. लवादासमोर सादर करण्यासाठी सरकारने सादर केलेल्या आराखड्यानुसार, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने टोंक माशेल, आमोणे पूल, मांडवी पूल व मेरियॉट येथील धक्का या पाच ठिकाणी प्रदूषणमापन करण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. मांडवीचा माशेल ते वळवई या ९ किलोमीटरचा टप्पा, पणजी ते माशेल हा २० किलोमीटरचा टप्पा प्रदूषित झाला आहे. त्यावर उपाय काढण्यासाठी थेट मलजल नदीच्या पात्रात सोडणाऱ्या घरमालकांवर कारवाई करणे, त्यांच्या शौचालयांना शोषखड्डे बांधणे अनिवार्य करणे ही कारवाई करण्यासाठी पंचायत संचालनालयाला सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. नदीत फेकण्यात येणारा कचरा संकलित व्हावा, वर्गीकरण व्हावे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ सहा महिन्यांत व्यवस्था करणार आहे. त्याशिवाय बायंगिणी येथील प्रस्तावित कचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मालीम येथील सांडपाणी
प्रक्रिया प्रकल्‍प लवकरच

मालीम येथे नदी किनारी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांतील मलजल व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. वर्षभरात ही व्यवस्था करण्याचे काम मत्स्योद्योग खात्याकडे सोपवण्यात आले आहे. पाटो प्लाझा येथील सांडपाणी प्रक्रिया व मलनिस्सारण प्रकल्प वर्षभरात अद्ययावत केला जाणार आहे. मांडवीतील जैव रासायनिक प्राणवायूचे प्रमाण घटल्याचे लक्षात आल्याने तातडीने उपाययोजना करण्याचेही सरकारने ठरवले आहे. सरकारने हा कृती आराखडा लवादासमोर आता सादरही केला आहे.

काय म्‍हटले अहवालात...
मांडवी नदीतील प्रदूषणकारी बॅक्टेरियांचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. यामुळे आंघोळ करणे, जलक्रीडा प्रकार आणि मासेमारीसाठी ही नदी सुरक्षित राहिली नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.
पिळर्ण, कांदोळी, रेईश मागूस व नेरुल येथील उपनद्यांतून मांडवी नदीला प्रदूषणमुक्त पाणी मिळते. त्याविषयी सरकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला आहे.
म्हादईचा उगम कर्नाटकातील भीमगड परिसरात ३० झऱ्यांतून होतो. खांडेपार, वाळवंटी, डिचोली, अस्नोडा, सिकेरी व म्हापसा या म्हादईच्या उपनद्या आहेत.

संबंधित बातम्या