राज्यातील ३०० गावात म्हादईमाता जल पूजन

Dainik Gomantak
गुरुवार, 16 जानेवारी 2020

येत्या ४ फेब्रुवारीला नार्वे येथील सप्तकोटीश्वर मंदिरात १०८ दांपत्ये म्हादईच्या ९ उपनद्यांतून एकत्र केलेल्या जलाने भरलेल्या कलशांचे पूजन करणार आहेत.

पणजी

भारत माता की जय संघटनेतर्फे म्हादई बचाव आंदोलनाचा पुढील टप्पा राबवताना राज्यातील ३०० गावात म्हादईमाता जल पूजनाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. संघटनेचे सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ते म्हणाले, राष्ट्रचेतना संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचवेळी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. सुर्ल-सत्तरी येथे म्हादईच्या संगमावरील पाणी कलशात भरून त्याचे पूजन करण्यात आले. ४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी याकाळात राज्यभरांतील गावात असे पूजन केले जाईल. जनजागृतीसाठी हा कार्यक्रम आहे. येत्या ४ फेब्रुवारीला नार्वे येथील सप्तकोटीश्वर मंदिरात १०८ दांपत्ये म्हादईच्या ९ उपनद्यांतून एकत्र केलेल्या जलाने भरलेल्या कलशांचे पूजन करणार आहेत. त्याचवेळी तालुका पातळीवर कलश पूजनासाठी दिले जातील. नंतर ते गाव पातळीवर उपलब्ध केले जातील. त्याच्या आयोजनासाठी २० जानेवारीला सायंकाळी सहा वाजता पर्वरी येथील विवेकानंद सभागृहात तर २१ रोजी मडगाव येथील लिंगायत सभागृहात पाचशे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या मोहमेला १५० संस्थांनी पाठिंबा दिला असून याचे प्रमुख म्हणून प्रा. गोविंद देव काम पाहतील तर संयोजन अवधूत कामत करतील.
यावेळी प्रा. प्रवीण नेसवणकर, दत्ता पु. नाईक, संदीप पाळणी, नितीन फळदेसाई व सूर्यकांत गावस उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या