म्हादई बचाव मिशन द्वारे युवकांचा अनोखा उपक्रम

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

स्वच्छता अभियानातून म्हादई बचाव मिशन
सत्तरीतील युवक - युवतींनी राबविले आदर्शवत अभियान

म्हादई नदीच्या काठावर स्वच्छता अभियानातून म्हादई बचाव मिशन कार्यक्रमात सहभागी झालेले सत्तरी तालुक्यातील युवक व युवती.

वाळपई : सध्या गोव्यात म्हादई बचाव आंदोलन सुरू आहे आणि अनेक राजकीय पक्ष आंदोलनात आहेत, पण या सर्वाला फाटा देऊन एक आगळे वेगळे संपूर्ण गोव्यासाठी आदर्शवत ठरणारे म्हादई बचाव मिशन स्वच्छता अभियानातून सत्तरी तालुक्यातील एकूण ३२ युवक आणि युवतींनी नानोडे - बांबर येथील म्हादई नदीच्या काठावर एकत्रित येऊन राबविले आणि अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.

या अभियानात उपस्थित असलेल्या ३२ युवक आणि युवती म्हादई नदीच्या विषयावर बोलल्या. युवकांनी सुरवातीला नानोडे - बांबर येथील हेलिपॅडची साफसफाई केली. त्यानंतर म्हादई नदीच्या काठावर असलेला केरकचरा पिशव्यांमध्ये गोळा केला आणि नंतर सर्वांचे एकत्रीकरण म्हादई नदीच्या काठावर झाले.

यावेळी युवकांना संबोधित करताना ॲड. शिवाजी देसाई म्हणाले, सत्तरी तालुक्यातील युवक म्हादई नदीच्या बाबतीत बोलत नाही. ही कल्पना आज इथे उपस्थित असलेल्या युवकांनी चुकीची ठरविली आहे. कारण इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण म्हादई विषयावर बोलला आहे. अशा अभियानामुळे संपूर्ण गोव्यात एक चांगला सकारात्मक संदेश जाणार आहे.

सत्तरी तालुक्यात आज अनेकजण विरंगुळ्यासाठी म्हादई नदीच्या काठावर येत असतात. आमचा त्यांना यायला विरोध अजिबात नाही, पण त्यांनी म्हादई नदीच्या काठावर कचरा ठेऊन जाता कामा नये. त्यांनी स्वतःचा कचरा स्वतः सोबत न्यावा. म्हादई नदीवर दारू पिऊन नको त्या गोष्टी करू नयेत. सत्तरी तालुक्यातील युवक अजिबात कमजोर नाहीत. युवकांनी चांगल्या गोष्टी करण्यासाठी पुढे आले पाहिजे आणि त्यासाठी कुणालाही घाबरायची गरज नाही. युवकांनी स्वतःच्या हक्कांसाठी अधिकारांसाठी बोलले पाहिजे. आज स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून पंचायतींना निधी येतो, पण तो निधी नीट वापरला जातो की नाही हे तपासण्याची वेळ आली आहे. म्हादई नदी वाचविण्यासाठी आम्ही सर्वांनी कटिबध्द असले पाहिजे. म्हादई नदीचे सर्व काठ हे कचरा मुक्त झोन म्हणून घोषित करायला हवेत.

विजय नाईक म्हणाले, की स्वच्छता अभियानातून म्हादई बचाव मिशन ही खरोखरच आदर्शवत संकल्पना आहे आणि या संकल्पनेचे सर्वत्र अनुकरण व्हायला हवे. ही संकल्पना जरी छोटी वाटत असली, तरी याचे भविष्यात खूप चांगले परिमाण होणार आहेत. समीर बागी म्हणाले, की आपण छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींमधून पुढे आले पाहिजे. म्हादई वाचविणे ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. पण त्यासाठी स्वच्छता देखील तेवढीच महत्वाची आहे. नगरगावचे माजी उपसरपंच रामा खरवत म्हणाले, या कल्पनेमुळे फार मोठी जनजागृती होणार आहे.

आज खरे म्हणजे युवकांनी स्वच्छतेचे मिशन हातात घेतले पाहिजे. आदित्य बोट्टरकर म्हणाले, की म्हादई नदीच्या तीरावर येऊन तिथे साफसफाई करणे आणि म्हादई नदी विषयावर बोलणे खूपच आनंददायी आहे, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आम्हाला आता पुन्हा पुन्हा हे काम करायचे आहे. यावेळी बाबुराव हुमाने, दीपेश हुमाने, ओमकार गावकर, अभिराज ओझरेकर, चेतन सावर्डेकर, स्वप्निल नाईक, यशवंत पर्येकर, सौरव ओझरेकर, नितेश सावर्डेकर, अर्जुन खरपलकर, गोविंदा म्हाऊसकर, अंकुश म्हाउस्कर, निशित ओझरेकर, रश्मिता ओझरेकर, अर्पिता बोत्तरकर, मेघा पर्येकर, सुजय तरवळकर, श्रीकृष्ण खरपलकर, विश्वास खरपलकर, राम ओझरेकर , उत्कर्ष चारी, राम उस्तेकर, ओम ओझरेकर, उमेश बोट्टरकर, सातू गावकर व इतर युवकांनी म्हादई नदीप्रती आस्था प्रगट करून विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाने एक कुटुंब झाले प्रभावीत
विशेष म्हणजे म्हापशाहून म्हादई नदीच्या काठावर आलेल्या एका कुटुंबाने युवकांचा हा उपक्रम पाहून खूप कौतुक केले आणि त्याचबरोबर ते कुटुंब देखील स्वतःचा कचरा स्वतः घेऊन गेले. युवक - युवतींच्या स्वच्छता अभियानाचा या कुटुंबावर प्रभाव पडल्याने त्यांनी आपला कचरा तेथून नेला.
 

संबंधित बातम्या