म्हादई नदीचे पाणी वळवणारच

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

म्हादईचे पाणी कर्नाटकाला मिळवूच
मंत्री रमेश जारकीहोळी; कणकुंबीत ‘कळसा-भांडुरा’ची पाहणी, न्यायालयाचे निर्देश पाळणार

कळसा-भांडुरा प्रकल्पाची पाहणी करताना कर्नाटकचे पाटबंधारेमंत्री रमेश जारकीहोळी. बाजूस कर्नाटकचे अधिकारी.

कणकुंबी : म्हादई नदीचे पाणी कळसा भांडुरा प्रकल्पाच्या आधारे कर्नाटकच्या शेतकऱ्यांना मिळवून देणारच. हा प्रकल्प पेयजलाचा असल्याने या प्रकल्पासाठी आणखी कोणतीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असा दावा कर्नाटकचे पाटबंधारेमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज येथे केला. कळसा भांडुरा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या पाहणीदरम्यान त्यांनी पत्रकारांना दूर ठेवले. तशी सूचना त्यांनीच पोलिसांना केली होती.

ते म्हणाले, कर्नाटकातील शेतकऱ्यांनी जीव देऊन म्हादई प्रकल्पासाठी प्रयत्न केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना टाळून कोणताही निर्णय घेतला जाणार नाही; पण कर्नाटकच्या वाट्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळवून देऊ. प्रकल्प पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने कोणतीही परवानगी घेण्याची आवश्‍यकता नाही.

पाटबंधारेमंत्री जारकीहोळी यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता कणकुंबी येथील कळसा-भांडुरा प्रकल्पाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘केवळ म्हादईच नाही, तर कृष्णा नदीसह इतर नद्यांतून पाणी वळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. म्हादईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्यावर जास्त काही बोलणार नाही; पण अधिसूचना जारी केल्यामुळे कर्नाटकाला दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्‍यकता नाही. त्यामुळे तत्काळ प्रकल्पाच्या कामाला सुरवात करू.’

तत्पूर्वी, मंत्री जारकीहोळी यांनी कळसा-भांडुरा प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी कळसा नाल्यातून पाण्याचा प्रवाह अत्यल्प होता. याबाबत त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, आता एवढेच पाणी आहे; पण धरण बांधल्यास अधिक पाण्याचा विसर्ग होईल, असे सांगितले. यावरून कळसा-भांडुरा प्रकल्प कोणत्याही स्थितीत पूर्ण करण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला असल्याचे स्पष्ट झाले.

मंत्री जारकीहोळी प्रकल्पाची पाहणी करताना त्यांच्यासोबत कोणीही पत्रकार जाणार नाही, याची काळजी घेतली होती. छायाचित्र घेणाऱ्या व्यक्तीसह पत्रकाराला पोलिसांनी प्रकल्पस्थळावरून पिटाळून लावले. स्वत: मंत्री महोदयांनीही काही मिनिटातच त्यांचा दौरा आटोपता घेतला. त्यांचा सत्कार समारंभही बंद खोलीआड झाला. त्यामुळे दोन दिवसांपासून आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कन्नडिगांचा हिरमोड झाल्याचे पाहावयास मिळाले.

प्रकल्पाच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी तहसीलदार रेश्‍मा तालीकोटी, माजी आमदार अरविंद पाटील, पाटबंधारे खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मधुकर, कॉंग्रेस नेते रफीक खानापुरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, बाबूराव देसाई आदी उपस्थित होते.

भाजप उमेदवारांची अजून एक यादी

मंत्र्यांचा आदेश अन्‌ पोलिसांचे पालन
मंत्री जारकीहोळी कणकुंबीत दाखल झाले; त्याचवेळी गोव्यातील पत्रकारही त्याठिकाणी दाखल झाले होते. त्यांना त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा खटाटोप सुरू होता. व्यासपीठावर जाऊन मानसन्मान स्वीकारण्याऐवजी त्यांनी प्रकल्पाला भेट दिली. तत्पूर्वी, त्यांनी त्यांच्यासमवेत पत्रकारांनी येऊ नये, अशी सूचना केली. पोलिसांनीही त्यांच्या आदेशाचे पालन करत कोणीही पत्रकार किंवा छायाचित्रकार त्यांच्यासोबत जाणार नाही, याची काळजी घेतली.

संबंधित बातम्या