सीएएविरोधातील आजची म्हापशातील सभा अखेर रद्द

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

म्हापसा:सभेला आक्षेप घेणारे निवेदन सादर करताना स्वराज्य गोमंतक आणि देशप्रेमी नागरिक या संघटनांचे कार्यकर्ते.परवानगी पालिकेने अचानक मागे घेतल्याने अन्याय झाल्याचा सहयोग संघटनेचा दावा
सीएए’ विरोधात "सहयोग' या संघटनेने शनिवार १८ रोजी म्हापसा टॅक्‍सी स्थानकावर आयोजित केलेल्या सभेस दिलेली परवानगी अखेर म्हापसा पालिकेने मागे घेतल्याने ती सभा रद्द करण्यात आली आहे.आम्ही लोकशाही तत्त्वांचे पालन करणारे तसेच कायदा मानणारे आहोत; त्यामुळे सभा रद्द करण्यात आली आहे, असे सहयोगचे निमंत्रक फिरोज खान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

म्हापसा:सभेला आक्षेप घेणारे निवेदन सादर करताना स्वराज्य गोमंतक आणि देशप्रेमी नागरिक या संघटनांचे कार्यकर्ते.परवानगी पालिकेने अचानक मागे घेतल्याने अन्याय झाल्याचा सहयोग संघटनेचा दावा
सीएए’ विरोधात "सहयोग' या संघटनेने शनिवार १८ रोजी म्हापसा टॅक्‍सी स्थानकावर आयोजित केलेल्या सभेस दिलेली परवानगी अखेर म्हापसा पालिकेने मागे घेतल्याने ती सभा रद्द करण्यात आली आहे.आम्ही लोकशाही तत्त्वांचे पालन करणारे तसेच कायदा मानणारे आहोत; त्यामुळे सभा रद्द करण्यात आली आहे, असे सहयोगचे निमंत्रक फिरोज खान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
१८ रोजी दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत सभा घेण्यास सोमवार १३ रोजी म्हापसा पालिकेने परवानगी दिली होती; तथापि, टॅक्‍सीस्थानकाचा वापर करण्यास परवानगी नाकारत असल्याचे पत्र आज शुक्रवारी फिरोज खान यांना देण्यात आले.नियोजित सभेमुळे शांतताभंग होऊन सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याचे नमूद करून "स्वराज्य गोमंतक', "देशप्रेमी नागरिक, म्हापसा' यांनी त्या सभेला आक्षेप घेणारे निवेदन १७ रोजी सादर केल्याने कार्यक्रमाला दिलेली परवानगी नाकारत असल्याचे पत्र म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा यांनी फिरोज खान यांना दिले आहे.त्या पत्राच्या प्रती म्हापसा पालिकेने उपजिल्हाधिकारी, म्हापशाचे पोलिस निरीक्षक, म्हापसा पालिकेचे निरीक्षक यांना तसेच स्वराज्य गोमंतक आणि देशप्रेमी नागरिक या संघटनांना रवाना केल्या होत्या.
आज शुक्रवारी सायंकाळी म्हापसा पोलिस निरीक्षकांनी फिरोज खान यांना पोलिस स्थानकात बोलावून घेतले असता उद्या शनिवारी आयोजित केलेली सभा रद्द करण्यात आल्याचे फिरोज खान यांनी त्यांच्यासमोर स्पष्ट केले. त्यानंतर पोलिस निरीक्षक फिरोज खान यांना घेऊन उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर गेले व पोलिसांच्या सूचनेनुसार फिरोज खान यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना हमीपत्राद्वारे स्पष्ट केले की उद्या शनिवारी सभेचे आयोजन केले जाणार नाही.फिरोज खान म्हणाले, आम्ही फक्‍त सभेचे आयोजन केले होते.मिरवणुकीचे आयोजन केलेच नव्हते. आज शुक्रवारी दुपारी अचानक मला म्हापसा पालिकेतून फोन आला आणि दिलेली परवानगी रद्द करण्यात येत आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या घरी जाऊन त्यासंदर्भातील नोटीस तिथे चिकटवली. त्यानंतर मी पालिकेत जाऊन त्यासंदर्भातील पत्राची प्रत स्वीकारली. आमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना मी जाब विचारला असता मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे होते, की काही संघटनांनी सभेला हरकत घेतली असून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नाच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली आहे. आम्ही त्या सभेस मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती.जवळजवळ दीड हजार लोक या सभेला उपस्थित राहण्याची अपेक्षा होती.त्याबद्दल आम्हाला आर्थिक खर्चही बराच झालेला होता.तथापि, शेवटच्या क्षणी परवानगी नाकारण्यात आल्याने आमचे खूपच नुकसान झाले आहे.पालिकेला निवेदन सादर करून त्या सभेला आक्षेप घेणाऱ्यांमध्ये 33 व्यक्‍तींचा समावेश होता. त्या निवेदनावर चंद्रकांत पंडित, नितीन आजगावकर, संजय वालावलकर, विकास महाले, सिद्धार्थ मांद्रेकर, जयेश थळी, सिद्धेश फळारी, वासुदेव कामत, उदय मुंज, तुषार केळकर, धर्मा नाईक, तनीश केणी, रितेश मणेरकर, गणेश पिळणकर, परेश पालयेकर, प्रशांत वाळके, प्रवीण शिंदे, हेमश्री गडेकर, प्रीती पार्सेकर, साईनाथ राऊळ, गौरेश केणी इत्यादींच्या सह्या आहेत

अर्थसंकल्पाचा कृती अहवाल सादर करा​
पालिकेची कृती अयोग्यच
‘सीएए’विरोधात आयोजित केलेल्या रॅलीला दिलेली परवानगी म्हापसा नगरपालिकेने मागे घेणे अयोग्य आहे. म्हापसा शहराला कलंकित करण्यासारखी ही कृती आहे.आपल्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे.सर्व प्रकारचे कायदेशीर परवाने घेतलेले असतानाही एका गटाच्या सांगण्यावरून मिरवणूक आयोजित करू नये, अशा आशयाचा म्हापसा नगरपालिकेने दिलेला आदेश म्हणजे लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे.मागच्या दाराने लोकशाहीचा खून करण्यासारखाच हा प्रकार आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते राहुल प्रभु म्हांबरे यांनी व्यक्त केले.

आम्ही कायदा पाळतो
"सहयोग' या संघटनेचे निमंत्रक फिरोज खान म्हणाले, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हांवर खरोखरच अन्याय केलेला आहे.आम्ही कायदा मानणारे आहोत, त्यामुळेच अन्याय झाला असतानाही आम्ही आमची सभा रद्द केलेली आहे. वकिलाचा सल्ला घेऊन म्हापसा पालिकेच्या त्या आदेशाला आम्ही योग्य त्या अधिकारिणीकडे निश्‍चितच आव्हान देणार आहोत. आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची निदान शेवटची संधी पालिकेने द्यायला हवी होती.

संबंधित बातम्या