‘महावीर’चे पीपीई कीट मिळतेय ५०० रुपयांत

‘महावीर’चे पीपीई कीट मिळतेय ५०० रुपयांत

विलास ओहाळ

पणजी,  

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवेतील डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना अत्यंत उपयुक्त असलेले वैयक्तिक संरक्षण उपकरण (पीपीई) कीट अवघ्या पाचशे रुपयांत खोर्ली येथील ‘महावीर प्लास्टिक इंड’ या कारखान्यात बनवले आहे. सध्या हे पीपीई कीट प्रमाणीकरण करण्यासाठी कोईमब्‍तूरच्या दक्षिण भारत वस्र संशोधन संघटनेकडे (सिट्रा) पाठविले असून, त्यांच्याकडून मान्यता मिळताच सध्याच्या उत्पादनापेक्षा त्याचे येथे दुप्पट उत्पादन केले जाणार आहे.
जगभर कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यातच भारताला कोरानाचे उगमस्थान असलेल्या चीनमधूनच लाखो पीपीई कीट आले, ते वापरण्यायोग्य सुरक्षित नसल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले. त्यामुळे ते वापरता येत नाहीत. त्याशिवाय इतर राज्यांनी राज्यात निर्माण होणाऱ्या पीपीई कीट तेथीलच आरोग्य सेवेत कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावेत, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्यात पीपीई कीट जरी आयात आणि खरेदी करावयाचे झाल्यास त्याची किंमत साधारण ८०० ते १२०० रुपयांपर्यंत जाते. काही कंपन्या आपल्या ब्रँडनेमच्या नावाखाली अशी कीट दोन हजारांच्यावरही ऑनलाईन विकतात. परंतु, खोर्ली येथील गेली २० वर्षे प्लास्टिक व्यवसायात सक्रिय असलेल्या प्रकाश कापडिया यांनी सध्या इतर उत्पादने बाजूला ठेवून ‘पीपीई कीट' तयार केले आहे.
सध्या आम्ही कीटबरोबरच मास्कचीही (मुखावरण) निर्मिती करतो. दिवसाला ५००० मास्क आम्ही तयार करून राज्यातील कंपन्या, संघटना, वितरकांना पाठवितो. त्याशिवाय दिवसभरात एकाच मशिनचा वापर होत असल्याने ५० पीपीई कीट तयार केले जातात. या उद्योगाला लघुउद्योग विकास बँकेचे सहकार्य लाभले आहे.

--------------------
आम्ही बनविलेले पीपीई कीट पूर्णपणे सुरक्षित आहे. आमच्याकडून काही डॉक्टरांनी कीट नेले असून, त्याचे प्रमाणीकरण त्यांनी स्वतः ‘सिट्रा’कडून करून घेतले आहे. आम्ही सध्या तोटा सहन करून राज्याचा विचार करून या कीटची निर्मिती केली आहे. या कीटसाठी आमच्याकडे असणाऱ्या एका मशिनमध्ये थोडा बदल करून उत्पादन सुरू केले आहे. शिवाय त्यासाठी लागणारा सर्व कच्चामाल मुंबई, हैद्राबादहून वाहन पाठवून आणण्यात आला.
-प्रकाश कापडिया, महावीर प्लास्टिक इंड, खोर्ली.

------------------------------
पुढील काळाचा विचार
महत्त्वाचा : कापडिया

आयएसओ प्रमाणीत असलेल्या ‘महावीर प्लास्टिक इंड’ कंपनीत शंभरपेक्षा अधिक कामगार काम करतात. परंतु, सध्या कंपनीत १५ कामगारांवरच उत्पादन सुरू आहे. उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही आणखी एक मशिन चीनमधून आयात करीत आहोत. ‘सिट्राकडे मागील सात दिवसांपूर्वी आम्ही कीट चाचणीसाठी पाठविल्या आहेत. त्यांच्याकडून ते प्रमाणीत होतील आणि आम्हाला उत्पादन वाढीस मंजुरी मिळेल, असा विश्‍वास आहे. कोरोनाचे रुग्ण सापडले नाहीत, म्हणून संकट गेले असे नाही, त्यामुळे केवळ कोरोनाविषयी नव्हे, तर पुढील काळाचा विचार करणे गरजेचे आहे, असेही कापडिया यांनी प्रांजळपणे नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com