म्हावळिंगे पंचायत जागा मालकापुढे नमली!

Dainik Gomantak
सोमवार, 4 मे 2020

आमदार झांट्‍ये यांची मध्यस्थी ः इमारत व रस्त्याचा मार्ग खुला

विलास ओहाळ

पणजी,

डिचोली तालुक्यातील वन म्हावळिंगे, कुडचिरे पंचायत अखेर जागा मालकापुढे नमली आहे. विना परवाना लाखो रुपयांची पंचायतीची इमारत जागा मालकाकडून ना हरकत दाखला घेता बांधली, पण त्या इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिले. याशिवाय ना हरकत दाखल्यामुळे रस्त्यांचे कामही अडले होते, पण अखेर आमदार प्रवीण झांट्‍ये यांनी मध्यस्थी केल्याने आता इमारतीसह रस्त्यांच्या कामाचाही मार्ग मोकळा झाला आहे.
स्व. बाबाजी राणे यांच्या बहिणी जयश्री राजेभोसले आणि प्रियवंदा जाधव यांची कोणतीही परवानगी न घेता पंचायतीने त्यांच्या जागेत २०१५ मध्ये आपली इमारत उभारण्यास सुरुवात केली. इमारतीसाठी लाखो रुपये खर्च केले, जेव्हा इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले त्यावेळी या कामाला जागा मालकांनी आक्षेप घेतला. त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दावाही दाखल केला. त्याचवेळी पंचायत मंडळाला न्यायालयाने दणका दिला होता. म्हावळिंगे पंचायतीची जी जुनी इमारत होती, तिची अवस्था फारच बिकट झाली आहे, गेल्या पावसाळ्यात या इमारतीवर झाडही पडले होते. ना हरकत दाखला न मिळाल्याने मयेकरवाडा, पलवडवाडा आणि मंदीर याठिकाणी जाणाऱ्या रस्त्याचे काम अडले होते.
पंचयातीने नवी इमारत बांधताना संबंधित जागा मालकाला अजिबात विचारात घेतले नाही. पंचायत हे काम बेकायदेशीरपणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत होते. न्यायालयात हे प्रकरण गेल्यामुळे पंचायतीला आपले कामकाज एका दुसऱ्या इमारतीतून करावे लागत आहे. हा प्रश्‍न सोडवावा म्हणून पंचायत सदस्य आमदार प्रवीण झांट्‍ये यांच्याकडे गेले. त्यांनी काही दिवसांपूर्वी सर्व अधिकाऱ्यांना, सरपंच शितल सावळ यांना घेऊन पाहणी केली. त्यावेळी हे काम पुढे नेले जाईल, असे अभिवचन त्यांनी दिले होते. दरम्यान, जागेच्या वादाचे प्रकरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे पोहोचले होते.

ठराव घ्यावा लागणार
आमदार झांट्‍ये यांनी २१ एप्रिल रोजी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत सरपंच शितल सावळ, माजी सरपंच मधू केसर नाईक, शिक्षक अभियंता तामूसकर, अभियंता शंभू मालवणकर आदी उपस्थित होते. त्यावेळी पंचायतीने जागा मालकाकडे जागा मागितली पाहिजे. कारण पंचायत ती जागा खरेदी करू शकत नाही म्हटल्यानंतर त्या मालकाला विनंती करून ती मागावी लागेल, हे पंचायतीला आमदारांनी पटवून दिले. त्यावेळी ना हरकत दाखल्याची मागणी केल्यास ती देऊ, अशी हमी जमिनीचे देखभाल करणाऱ्या व्यक्तीने या बैठकीत दिली. परंतु पंचायतीला जागा मालकाकडे ना हरकत दाखला मागितल्याचा ठरावाची प्रत उच्च न्यायालयात दाखल करावी लागणार आहे. तेव्हाच पंचायतीपुढील मार्ग मोकळे होणार आहेत.

 

 

संबंधित बातम्या