‘मिग २९ के’ अपघातग्रस्‍त

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

वैमानिक सुखरुप : तीन महिन्‍यांतील दुसरी घटना

रविवारी सकाळी विमानाने सरावासाठी उड्डाण केले होते. सदर विमान किनारपट्टीवरून दूरवर सराव करीत होते. अचानकपणे विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे नजरेस येताच वैमानिकाने प्रसंगावधान राखून ‘इजेक्ट’ करून विमानातून पॅराशूटद्वारे सुखरूपपणे बाहेर पडला.

वास्को : भारतीय नौदलाच्या दाबोळी हंस तळावरून नियमित सरावासाठी उड्डाण केलेले एक आसनी दोन यंत्रणा असलेले ‘मिग २९ के’ हे विमान रविवारी सकाळी १०.३० वा.च्‍या सुमारास अरबी समुद्रात (बेतूल हद्दीत) अपघातग्रस्त झाले. सदर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिक ‘इजेक्ट’ करून विमानातून सुखरूपणे बाहेर पडला. गेल्या तीन महिन्यामध्ये ‘मिग के २९’ला अपघात होण्याची ही दुसरी घटना तर दोन वर्षातील तिसरी घटना आहे.

विमान अपघातग्रस्त झाल्‍याची माहिती विमान नियंत्रण कक्षाला कळताच भारतीय नौदलाने वैमानिकासाठी शोधकार्य हाती घेतले. तथापि, वैमानिक सुखरूप सापडल्‍याने त्याला उपचारासाठी नौदलाच्या इस्पितळात नेण्यात आले. त्याची प्रकृती ठीक आहे. सदर विमान अरबी समुद्रात नेमके कोठे कोसळले? याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. विमान कोणत्या कारणास्तव कोसळले यासंबंधी चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे नौदलाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

भारतीय नौदलाच्या हंस तळावरील ‘मिग २९ के’ ही विमाने सकाळच्या वेळी नियमित सराव करतात. त्यामध्ये ट्रेनर, एक आसनी, दोन आसनी विमानांचाही समावेश असतो. त्यामुळे सकाळी दाबोळी विमानतळाची धावपट्टी नागरी विमानाच्या उड्डाणासाठी बंद ठेवण्यात येते. ‘मिग २९ के’ हे भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये सामील झाल्यापासून गेल्या दोन वर्षामध्ये घडलेला हा आतापर्यंतचा तिसरा अपघात आहे. रशियन बनावटीची ‘मिग २९ के’ ही लढाऊ विमाने भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये नऊ वर्षांपूर्वी सामील झाली होती. माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांच्या उपस्थितीत ही विमाने भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये सामील करून घेण्यासाठी हंस विमानतळावर सोहळा आयोजित केला होता.

‘मिग २९ के’ अपघातांची मालिका थांबता थांबेना..!
दाबोळी, ता. २३ (वार्ताहर) : भारतीय नौदलाच्‍या ताफ्‍यात ‘मिग २९ के’ ही लढावू विमाने दाखल झाल्‍यानंतर सर्वप्रथम ३ जानेवारी २०१८ रोजी नौदलाच्या हंस विमानतळावर पहिला अपघात झाला. धावपट्टीवरून विमान उड्डाण करताना एका ‘मिग २९ के’चे चाक घसरून धावपट्टीपासून दूर गेले होते. यावेळी शिकाऊ पायलटाने प्रसंगावधान राखत ‘इजेक्ट’ केल्याने तो सुखरूप राहिला. मात्र विमानाच्या इंजिनाने पेट घेतल्याने नौदलाच्या अग्निशमन दलाने आग विझवली होती.

दुसरा अपघात
८ जून २०१९ रोजी सरावासाठी निघालेल्या मिग २९ के विमानाची अतिरिक्त इंधन टाकी धावपट्टीवरून कोसळून मोठा भडका उडाला होता. त्यामुळे दाबोळी विमानतळावरील नागरी विमानसेवा तीन तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. धावपट्टीची साफसफाई केल्यावर धावपट्टी उड्डाणासाठी खुली करण्यात आली होती. या अपघातात विमान व वैमानिक सुखरुप राहिले होते.

तिसरा अपघात  

त्यानंतर १६ नोव्हेंबर २०१९ ला भारतीय नौदलाच्या दाबोळीच्या हंस विमानतळावरून नियमित सरावासाठी उड्डाण केलेल्या मिग २९-के ट्रेनर विमानाला पक्षांचा थवा धडकून इंजिनाला आग लागल्याने विमान वेर्णा पठारावर कोसळले होते. या विमानातील कॅप्टन एम. शिवखंड व लेप्टनंट कमांडर दीपक यादव यांनी प्रसंगावधान राखून विमान लोकवस्तीपासून दूर नेले होते. पॅराशूटचा वापर करून ते जमिनीवर सुखरूपणे उतरले होते. त्यांनी ‘इजेक्ट’ केल्यावर विमान तसेच पुढे जाऊन वेर्णाच्या माळरानावर कोसळले. विमान कोसळ्यावर ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या विमानाचे अवशेष ठिकठिकाणी विखुरले होते. विमानाचे काही धातूचे लहान पेटते भाग आसपासच्या घरांच्या छप्परावर पडले होते. त्यामुळे एका घराच्या स्वयंपाक खोलीला आग लागल्याने स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवली होती.

संबंधित बातम्या