खनिज वाहतूक पुन्हा भरधाव...

dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

साखळी मतदारसंघातील न्हावेली, आमोणे, सुर्ल, वेळगे, पाळी या ग्रामीण भागातून पुन्हा एकदा अंदाधुंदी पध्दतीने खनिज वाहतूक सुरू झाली असून सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर खनिज वाहतुक सुरू असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भयभीत वातावरण निर्माण झाले आहे.

साखळी

साखळी मतदारसंघातील न्हावेली, आमोणे, सुर्ल, वेळगे, पाळी या ग्रामीण भागातून पुन्हा एकदा अंदाधुंदी पध्दतीने खनिज वाहतूक सुरू झाली असून सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर खनिज वाहतुक सुरू असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भयभीत वातावरण निर्माण झाले आहे.
या भागातील खाण व्यवसाय गेली आठ वर्षे बंद होता, पण सरकारी पातळीवरून प्रयत्न केल्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार नवीन खाण माती उत्खनन न करता काढून साठवून ठेवलेल्या खनिज मालाचा लिलाव करून हा माल नेण्यासाठी खनिज वाहतूक सुरू करण्यात आली. गेली कित्येक वर्षे ट्रक व्यवसाय बंद असलेल्या ट्रकमालकांना दिलासा मिळालेला असला, तरी सरकारने व न्यायालयाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे गुंडाळून सध्या खनिज वाहतूक सुर असल्याचे दिसून येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रस्त्यावरून धावतात १२०० ट्रक!
मिळालेल्या माहितीनुसार, सेसा, फोमेन्तो, साळगावकर या कंपनीतर्फे खनिज वाहतूक सुरू झाली आहे. पाळी, वेळगे, सुर्ल, न्हावेली, आमोणे, कुडणे या भागातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. दर दिवशी सर्व कंपन्यांचे मिळून सुमारे १२०० ट्रक रस्त्यावरून धावत आहेत. सर्व कंपन्यांचा साठवलेला लिलाव केलेला माल आमोणे व मायणा येथील जेटीवर आणून तो बार्जमध्ये लोडींग केला जातो. नियम धाब्यावर बसवून खनिज वाहतूक होत असल्याने या भागात पुन्हा एकदा धुळ प्रदूषण, अपघातांच्या भितीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

लॉकडाऊनमध्ये वाहनचालक कुठून आले?
आठ वर्षांपूर्वी खाण व्यवसाय बंद पडल्यानंतर परराज्यातील वाहनचालक आपापल्या घरी परतले होते व सध्या कोरोना लॉकडाऊनमुळे बाहेरील वाहनचालक मिळणे मुश्कील आहे. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनचालक कुठून आले असा प्रश्नही नागरिक करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटन व कसिनो’ हे व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद असल्याने या व्यवसायातील वाहनचालकांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून या खनिज वाहतुकीमध्ये ओढले असून काहीजणांकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याचे समजते. त्यामुळे या वाहनचालकांना खनिज वाहतूक नियमांचे कसलेच ज्ञान नाही. त्यामुळे बेधुंदपणे ट्रक हाकलत असतात. कायद्यानुसार तासाला तीस ट्रक असा नियम आहे, पण सध्या एका मिनिटाला तीस ट्रक अशा सरासरीने बेकायदेशीर खनिज वाहतूक चालू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पहाटे ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत हे ट्रक खनिज माल घेऊन जात असतात. एक ट्रक एका वेळेला जास्तीत जास्त दहा टन माल नेऊ शकतो. अशा प्रत्येक ट्रकतर्फे आठ ते दहा खेपा मारल्या जातात.

वाहतूक खात्याचे दुर्लक्ष
या ग्रामीण भागात पुन्हा एकदा खाण व्यवसाय सुरू होणे गरजेचेच होते, पण अंधाधुंद बेकायदेशीर सुरू झालेल्या या खनिज वाहतुकीमुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. डिचोलीत आज ट्रक अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने नागरिकांची भिती वाढली आहे. वाहतूक खात्याचे या परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

खाण व्यवसायावर या भागातील असंख्य लोकांची रोजीरोटी चालते. त्यामुळे खाण व्यवासाय परत सुरू झालाच पाहिजे, पण सर्व नियम व अटी पाळल्या गेल्या पाहिजेत. लिलाव खनिज मालाची वाहतूक सध्या सुरू करण्यात आली आहे, पण नियमाचा भंग करून ही वाहतूक सध्या सुरू आहे. दोन ट्रकांमध्ये अंतर ठेवण्यात येत नाही. जादा खेपा मारण्यासाठी भरधाव ट्रक हाकले जातात. त्यामुळे धुळ प्रदुषणही वाढले आहे, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक खात्याने या ठिकाणी उपस्थित राहून या बेधुंद खनिज वाहतुकीवर कारवाई करावी.
- काशिनाथ म्हातो (सरपंच, आमोणे पंचायत)

संबंधित बातम्या