खाण कामगारांना जगणे असह्य झाले

Dainik Gomantak
बुधवार, 22 जानेवारी 2020

कंपनीच्या अन्यायामुळे आम्हाला आता जगणेच मुश्‍किल झाले आहे अशी व्यथाही कामगारांनी सभापतींसमोर मांडली.

तुकाराम सावंत

डिचोली

वेतनाच्या बाबतीत सेझा कंपनी व्यवस्थापनाकडून आमच्यावर अन्याय करण्यात येत आहे. आम्हाला कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप आर्थिक संकटात अडकलेल्या डिचोलीतील सेझाच्या अस्वस्थ कामगारांनी केला असून आर्थिक संकटातून मुक्‍त करण्यासाठी आम्हाला पूर्ण वेतन हवे आहे, अशी मागणी या कामगारांनी केली आहे. ही मागणी पुढे करीत कामगारांनी आज डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांची भेट घेवून आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. कंपनीच्या अन्यायामुळे आम्हाला आता जगणेच मुश्‍किल झाले आहे अशी व्यथाही कामगारांनी सभापतींसमोर मांडली. याप्रकरणी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली. कामगारांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर या विषयावर लवकरच कामगारांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन सभापती श्री. पाटणेकर यांनी दिले.
सेझा कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांच्या एका शिष्टमंडळाने आज सकाळी सभापती राजेश पाटणेकर यांची त्यांच्या डिचोली येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी नारायण गावकर, इंद्रकांत फाळकर, राजेश गावकर, बाबुसो कारबोटकर, दीपक पोपकर, रत्नकांत शेट्ये, अनिल सालेलकर, महेश होबळे, किशोर लोकरे आदींचा समावेश होता. यावेळी कार्यालयाबाहेर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खाणबंदी काळापासून खर्च कपातीचे कारण देवून कामगारांना अर्धे वेतन देण्यात येत आहे. वाहतूक आणि अन्य सुविधा देणे बंद केले आहे. उलट अधिकारीवर्गाला मात्र पूर्ण वेतन आणि अन्य सुविधा देण्यात येत आहेत. कंपनीच्या प्रगतीसाठी घाम गाळणाऱ्या गरीब कामगारांवर हा सरळसरळ अन्याय आहे. त्यामुळे कामगारांसमोर मोठी आर्थिक समस्या उद्‌भवली आहे. आम्हाला आमचे येणे असलेली थकबाकी कंपनीने दिलेली नाही. खाणींचे भवितव्य अधांतरी असले, तरी खाणी सुरू करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ही समाधानाची बाब असली, तरी कधी एकदाच्या खाणी सुरू होतात याची आम्हाला प्रतीक्षा आहे. खाणी बंद झाल्यापासून कामगार कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत. मात्र, कामगारांची सतावणूक सुरू आहे अशी कामगारांची तक्रार आहे. सध्या खाणीवरील ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक सुरू आहे. मात्र, कामगाऱ्याच्या भवितव्याचे कंपनी व्यवस्थापनाला काहीच पडलेले नाही. उलट कामगारांची एकप्रकारे सतावणूक सुरू आहे. असा दावा कामगारांनी केला आहे.
खाणी सुरू होईपर्यंत तरी सरकारने कामगारांच्या हिताचा विचार करून याप्रकरणी हस्तक्षेप करावा आणि कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
खाणी बंद झाल्यापासून आमच्या हातात पडणारे वेतन घरखर्चासाठी कमी पडत आहे. दुसऱ्या बाजूने आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. संसार कसा चालवायचा, मुला-बाळांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, आदी अनेक प्रश्‍नांनी डोक्‍यात घर केले आहे. आम्ही आंतरीक दुखण्याने व्यथित झालो आहोत. आता जिणे असह्य झाले आहे. जीवनाचा शेवट करावा असा विचारही कधी-कधी मनाला स्पर्श करीत आहे अशी व्यथा दीपक पोपकर, इंद्रकांत फाळकर आदी कामगारांनी सभापतींसमोर मांडली. सेझाच्या अन्य युनिटवरील कामगारांना पूर्ण वेतन देण्यात येते. मात्र, डिचोलीतीलच कामगारांना अर्धे वेतन देवून फसवणूक चालली आहे, असे नारायण गावकर म्हणाले.

संबंधित बातम्या