‘मिरामार' पर्यटक क्रूझला मंत्र्यांची आडकाठी बोटीचे ८० टक्के काम पूर्ण; २० टक्के काम शिल्लक

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

नदी परिवहन खात्याने मार्च २०१३, ऑक्टोबर २०१३ आणि फेब्रुवारी २०१४ मध्ये तीन जलमार्गावरील फेरीसेवा बंद केल्या.त्यापैकी ‘मिरामार’ ही फेरीबोट अतिरिक्त म्हणून ठरविण्यात आली.खात्याने या बोटीचे क्रूझ बोटीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फेरीबोट कार्यशाळेने त्यासाठी ३० लाख ४५ हजार ७८ रुपयांच्या खर्चही येणार असल्याचा अहवाल तयार केला.

पणजी: कमी अंतरावरील बंद केलेल्या फेरीबोटींपैकी एक बोट ‘मिरामार’ म्हणून मनोरंजनासाठी वापरण्याचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू झाले. त्या फेरीबोटीत कराव्या लागणाऱ्या दुरुस्त्यांपैकी ८० टक्के काम नदी परिवहन खात्याच्या कार्यशाळेने पूर्ण केले. परंतु या जहाजाचे २० टक्के राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी कार्यशाळेला आलेल्या अडचणींकडे दुर्लक्ष केले आणि खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी यावर्षीच्या जानेवारी महिन्यात ६ तारखेला या बोटीवर काहीच खर्च करू नका, असे स्पष्ट बजावले आहे. दरम्यान, कार्यशाळेने त्या बोटीवर ३० लाख रुपये केलेला खर्च असाच वाया जाणार की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

परतु नोव्हेंबर २०१९ मध्ये पर्वरी येथील महालेखापालांनी आपल्या निरीक्षण अहवालात ‘मीरामार’ या क्रूझ बोटीच्या रखडलेल्या कामाविषयी ताशेरे ओढले. अहवालानंतर या फेरीबोटीचे क्रूझमध्ये परिवर्तीत करण्याच्या उरलेल्या कामासाठी कार्यशाळेने खात्याच्या मंत्र्यांकडे परवानगी मागितली पण ती दिली नाही. विशेष म्हणजे जलमार्गावरून बंद झालेल्या फेरीबोटीचे क्रूझबोटीत परिवर्तीत करण्याचे अशक्य काम खात्याने कार्यशाळेला सांगितले. कार्यशाळेचा व्यवस्थापक या नात्याने बंदर कप्तानांनी खात्याला हे काम ‘शक्य नाही’ असे कळवायला हवे होते, पण तसे झाले नाही. उलट या कामात अनेक अडथळे येऊन ते काम रखडले गेले.

महालेखापालांच्या निरीक्षण अहवालात या कामावर बोट ठेवल्याने खरेतर खात्याने त्याची गंभीरतेने दखल घ्यायला हवी होती. पण आता ‘मिरामार' या क्रूझबोटीचे २० टक्के काम उरले आहे. प्राप्त माहितीनुसार या कामात कर्मचाऱ्यांच्या पगारावर, वेल्डिंग, रंगकाम अशा इतर कामांवर २९ लाख रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित १ लाख ४५ हजार रुपयांचे साहित्य आणले गेले आहे. ‘मिरामार' या बोटीचे काम विलंबासाठी कारणे काय आहेत याचा शोध नदी परिवहन ख्यात्याने करायला हवा होता, पण तसे झालेले नाही. खात्याला शिल्लक राहिलेले २० टक्के काम पूर्ण करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली, पण ‘मिरामार’ बोटीवर काहीच खर्च करू नका, असे स्पष्ट बजावले आहे.

गोव्याकडे येणारे म्हादईचे पाणी घटले

मिलिंद नाईक यांची तत्परता
नदी परिवहन खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी आपल्या खात्याच्या कार्यशाळेने महालेखापालांच्या अहवालानंतर उर्वरित २० टक्के काम पूर्ण करण्यासाठी परवानगी मागितील्यानंतर ज्या तत्परतेने ते काम थांबविण्यास सांगितले. तशा प्रकारची तत्परता मंत्री नाईक यांनी खात्यात चाललेल्या अनागोंदीविषयी का दाखविली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दै. ‘गोमन्तक’ने गेल्या आठवड्यापासून नदी परिवहन खात्यातील अनेक गौडबंगाल समोर आणले आहेत, पण त्याची चौकशी करण्याचे किंवा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे धारिष्ठ्य मंत्री नाईक यांनी दाखविणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेही नाही. त्यामुळे आतातरी मंत्री नाईक हे आपले मौन सोडून खात्यातील कारभाराच्या चौकशीला सुरवात करणार का, हे पाहणे उचित ठरेल.

 

संबंधित बातम्या