खाकी गणवेषाचा भ्रष्टाचारसाठी दुरुपयोग

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020
खाकी गणवेषाचा भ्रष्टाचारसाठी दुरुपयोग

पणजी

बेकायदेशीर रेती वाहतूक हा प्रश्‍न नाही तर रेतीवाहू चालकांकडून हप्ते घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना त्यांची जागा सरकारने दाखवून द्यायला हवी. लॉकडाऊनच्या काळात पोलिस जनजागृती करत असताना एका भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे त्यांचे प्रशंसनीय काम धुळीस मिळते. खाकी गणवेशाच्या पेडण्याच्या भ्रष्ट पोलिस निरीक्षकाबाबत कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र उद्या (१ मे) दक्षता खात्याचे संचालक तथा मुख्य सचिव तसेच पोलिस महानिरीक्षकांना देणार असल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी आज दिली.
पेडण्याचे पोलिस निरीक्षक हे भ्रष्ट अधिकारी असल्याची तक्रार यापूर्वी आमदार दयानंद सोपटे यांनीही सरकाकडे केली होती, यासंदर्भात
कोणतीच कारवाई झाली नाही. माझा आरोप उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर नाही तर भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध आहे. या अधिकाऱ्याविरुद्ध सरकारही कारवाई करू शकत नाही त्यामुळे त्याला कुणाचे तरी वजनदार राजकारण्याचा पाठिंबा असायला हवा, अशी टीका लोबो यांनी केली.
पोलिस हे नागरिकांचे रक्षक असतात तसेच मदतगार असतात मात्र या पोलिस अधिकाऱ्याने रेतीवाहू ट्रक चालकांकडून हप्ते घेत खंडणी
वसूल करून पोलिस खात्याला कलंक लावला आहे, रेती विक्री करणाऱ्याला ही खंडणी द्यावी लागत असली तरी या रेती विक्रेता ग्राहकाकडून अधिक दर लावून ती वसूल करत असतो. त्यामुळे पोलिसांनी घेतलेली खंडणी अप्रत्यक्षपणे ग्राहकाच्या खिशातूनच जाते. हा भ्रष्टाचार थांबायला हवा. हा अधिकारी आपल्या खाकी गणवेशाचा गैरउपयोग करत आहे. लोकांची सतावणूक करत आहे. त्याची या पेडणे तालुक्यात दहशत आहे. त्याला वजनदार व्यक्तीचाच पाठिंबा असल्याने तो कोणालाही जुमानत नाही असे मंत्री लोबो यांनी सांगितले. त्यामुळे लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्याची पेडणे पोलिस ठाण्यातून बदली होणे आवश्‍यक आहे असे ते म्हणाले.
हरमल या डोंगराळ भागात विदेशी नागरिकांची रेव्ह पार्टी झाली. या रेव्ह पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिकही जमा झाले होते त्यामुळे ही पार्टी आयोजित होते त्याची माहिती पेडणे पोलिसांना नाही म्हणजे हास्यास्पद आहे. या पार्ट्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यापूर्वीही या अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचारामुळे कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची पोलिस ठाण्यात वर्णी सरकारने लावू नये. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करून मुख्यमंत्र्यांनी पोलिस खात्यामध्ये एक संदेश द्यावा असे लोबो म्हणाले.

 

 

संबंधित बातम्या