मोहन बागानची धेंपोच्या विक्रमाशी बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या चार फेऱ्या बाकी ठेवून विजेतेपद मिळविलेल्या मोहन बागानने धेंपो स्पोर्टस क्लबच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

कोलकात्याच्या मोहन बागानने १६ फेऱ्यांत सर्वाधिक ३९ गुणांची नोंद करत २० फेऱ्यांच्या या स्पर्धेत यंदा विजेतेपद मिळविले आहे. त्यांनी ईस्ट बंगाल व पंजाब एफसी या जवळच्या प्रतिस्पर्ध्यांवर १६ गुणांची मोठी आघाडी मिळविली आहे, जी तोडणे शक्य नाही.

धेंपो स्पोर्टस क्लबने २००९-१० मोसमात चार फेऱ्या राखून आय-लीग स्पर्धा जिंकली होती, त्या विक्रमाशी मोहन बागानने यंदा बरोबरी साधली आहे. राष्ट्रीय साखळी फुटबॉल स्पर्धा व आय-लीग स्पर्धा मिळून धेंपो क्लबने पाच वेळा राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद मिळविल होते, या विक्रमासही मोहन बागानने यंदा गाठले आहे. भारतीय क्लब फुटबॉलमध्ये पाच वेळा राष्ट्रीय पातळीवर जेतेपद प्राप्त करणारे धेंपो क्लब व मोहन बागान हे दोनच संघ आहेत.
धेंपो क्लबने राष्ट्रीय साखळी फुटबॉल स्पर्धा २००४-०५ व २००६-०७ मध्ये जिंकली.

गोव्याच्या आय-लीग स्पर्धेत २००७-०८, २००९-१०, २०११-१२ मोसमात विजेतेपद मिळविले. या कामगिरीला गाठताना मोहन बागानने यंदा पाचवे राष्ट्रीय विजेतेपद प्राप्त केले. कोलकात्याच्या संघाने राष्ट्रीय साखळी फुटबॉल स्पर्धेत १९९७-९८, १९९९-२००० व २००१-०२ मोसमात बाजी मारली. आय-लीग स्पर्धेत त्याने सर्वप्रथम २०१४-१५ मोसमात विजेतेपद प्राप्त केले. त्यानंतर दुसऱ्यांदा यंदा २०१९-२० मोसमात आय-लीगमध्ये विजेतेपदास गवसणी घातली.

आता उपविजेतेपदासाठी चुरस

मोहन बागानच्या विजेतेपदामुळे आता आय-लीग स्पर्धेत उपविजेतेपदासाठी चुरस राहील. ईस्ट बंगाल व पंजाब एफसीचे प्रत्येकी २३ गुण, रियल काश्मीर, टिड्डिम रोड एथलेटिक युनियन (ट्राऊ) एफसी, गोकुळम केरळा या संघांचे प्रत्येकी २२ गुण, तर गतविजेता चेन्नई सिटी व गोव्याचा चर्चिल ब्रदर्स यांचे समान २० गुण आहेत. नेरोका एफसीचे १८, ऐजॉल एफसीचे १६ गुण आहेत. या दोन्ही संघांत पदावनती टाळण्यासाठी चढाओढ राहील. इंडियन एरोज संघ ९ गुणांसह शेवटच्या अकराव्या क्रमांकावर आहे.
 
संबंधित बातम्या