पर्ये: मातृभाषेतून शिक्षण हा केवळ जागतिक सिद्धांत नसून तो प्रत्येक मुलाचा अधिकार असल्याचे भान आपल्या देशातील पालकांना येईल तो सुदिन म्हणावा लागेल, असे उद्गार गोमंतकातील मराठी चळवळीतील एक प्रमुख व प्रखर व्यक्तिमत्त्व गो.रा. ढवळीकर यांनी काढले. मराठी अकादमीच्या सत्तरी प्रभागात मराठी दिन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी त्यांनी स्वतःचीच अनेक उदाहरणे देऊन आपले मत स्पष्ट केले. गोमंतकातील मराठी प्राचीन परंपरा आणि मराठी साहित्यात गोमंतकीयांनी घातलेली मोलाची भर याविषयी त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात विस्तृत माहिती दिली.
होंडा-सत्तरी येथील भगवान महावीर सरकारी माध्यमिक विद्यालय येथे कविवर्य कुसुमाग्रज मराठी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्तरी प्रभाग अध्यक्ष माजी उपसभापती नरहरी हळदणकर हे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर सत्तरी समन्वयक अकादमी सदस्य आनंद मयेकर व चंद्रकांत गावस, मुख्याध्यापक उल्हास गावकर व मोर्ले सत्तरी केंद्राध्यक्ष रामकृष्ण गावस उपस्थित होते.
यावेळी सरकारी प्राथमिक विद्यालय मोर्ले आणि सरकारी प्राथमिक विद्यालय पिसुर्ले यांनी आपल्या शिक्षिका तसेच जय श्रीराम गोशाळा अध्यक्ष हनुमंत परब यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर मराठी गीते सादर केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्ज्वलन करून तसेच कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
आपल्या प्रास्ताविकात आनंद मयेकर यांनी गोवा मराठी अकादमी ध्येयधोरण सांगून आपले जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण होण्यासाठी कुसुमाग्रजांपासून प्रेरणा घेऊन मायमराठीवर जाज्वल्य निष्ठा ठेवण्याचे आवाहन केले. तसेच मातृभक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला राज्यव्यवहारकोष लिहून मातृभाषेचे ऋण फेडले, त्याचप्रमाणे आज पालकांनीसुद्धा परकीय भाषा मुलांच्या माथ्यावर न थोपता सुरवातीचे शिक्षण मराठीतूनच देऊन आपली संस्कृती आणि संस्कार टिकविण्याचे दायित्व संभाळावे, असे आवाहन श्री मयेकर यांनी केले.
त्यानंतर कविता सादरीकरणाची सुरवात कु.रजनी परब यांनी कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकाराने केली. त्यानंतर ॲड.भालचंद्र मयेकर, संदीप केळकर, कु. हीरा गावकर इत्यादी कवींनी कुसुमाग्रजांच्या कविता उत्कृष्टपणे सादर केल्या.
कु. रजत गोसावी व कु. प्राची गावस या पर्ये येथील भूमिका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अत्यंत प्रभावशाली भाषण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. याशिवाय कु. शिवानी गावकर, सौ. रंजना गावकर इत्यादी कवींनी आठवणीतील कविता गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. मुख्याध्यापक उल्हास गावकर यांनी आवर्जून उपस्थित राहून अशाप्रकारच्या सर्व स्तुत्य उपक्रमांना सक्रिय सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात नरहरी हळदणकर यांनी आपली संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी तसेच मुलांनी शिक्षणात आनंदाने रस घ्यावा, यासाठी पालकांनी आपल्या मुलांना सुरुवातीचे शिक्षण मराठीतूनच देण्याची प्रतिपादन केले. रामकृष्ण गवस यांनी आभार मानले.