'पोगो’ विधेयक मंजूर न झाल्यास चळवळ

Movement if the 'pogo' bill is not approved
Movement if the 'pogo' bill is not approved

कळंगुट : गोव्यातील बाजारपेठा परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेल्या आहेत. राज्यातील पर्यटन व्यवसाय तसेच खाण व्यवसाय नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गोवा मुक्तीनंतर खुलेआम चारी बाजुंनी गोव्यात प्रवेश करणाऱ्या परप्रांतीयांमुळे स्थानिकांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. त्यांच्या अस्तित्वाचा तसेच अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्यानेच स्थानिकांना खऱ्या अर्थाने मुक्त करण्यासाठीच रिव्होलेशनरी गोवाची स्थापना करण्यात आली आहे. पर्सन ऑफ गोवन ओरिजीन (पोगो) विधेयक येत्या विधानसभेत मंजूर न केल्यास गोव्याच्या कानाकोपऱ्यात चळवळ उभारण्याचा इशारा संस्थेचे प्रमुख मनोज परब यांनी दिला.

चिवार - हणजुणे येथे आज संध्याकाळी रिव्होलेशनरी गोवातर्फे सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. गोव्याचा आर्थिक कणा असलेला पर्यटन तसेच खाण उद्योग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गोवा माईल्स या परप्रांतीय कंपनीला राज्यात आमंत्रित करून सरकारने स्थानिक टॅक्सीचालकांचा पारंपरिक टॅक्सी व्यवसाय डबघाईस आणून ठेवला आहे. सध्याचे सरकार हे स्थानिकांच्या विरोधात कार्यरत असल्यामुळे विधानसभेतील चाळीसही आमदारांना घरी पाठविण्याची वेळ आली असल्याचे आवाहन रिव्होलेशनरी गोवाचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले. म्हापशातील जगप्रसिद्ध बाजारपेठ पूर्णपणे परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेली असून यासाठी जबाबदार असलेल्या स्थानिक नगरपालिकेला लवकरच जाब विचारला जाणार असल्याचा इशाराही परब यांनी यावेळी दिला.

मोप विमानतळ हा राज्याच्या फायद्याचा नसल्यामुळे स्थानिक लोकांना त्यापासून काडीचाही कामधंदा मिळणार नसून याउलट जवळच्या महाराष्ट्र जिल्ह्यातील लोकांचा तालुक्यात वावर वाढणार असल्याची भीती त्यांनी बोलून दाखविली. गोवा माईल्स ही परप्रांतीय कंपनी गोव्यात आणून सरकारने स्थानिकांची गळचेप केलेली असल्याने यापुढे हा प्रश्न गोवा रिव्होलेशन आपल्या हाती घेणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी रिव्होलेशनरीच्या गोव्याच्या विविध भागातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी परप्रांतीय लोकांमुळे स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच सामाजिक अवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचे आपल्या भाषणात सांगितले. यावेळी पुरुष तसेच महिला आणि तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com