अधीक्षक बढती व बदल्यांच्या हालचाली

dainik gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

अधीक्षक बढती व  बदल्यांच्या हालचाली 

पणजी,

पोलिस खात्यातील पाच उपअधीक्षकांना बढती देण्याबाबत तसेच अधीक्षकांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भातची फाईल गृहमंत्र्यांकडे पोहचली असून लॉकडाऊनमुळे ती अडकली आहे. १४ एप्रिलला केंद्र सरकारने टाळेबंदीत वाढ केल्याने ही बढती व बदल्या अडल्या आहेत. त्यामुळे बढतीच्या रांगेत असलेल्या उपअधीक्षक सरकारच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
गोवा पोलिस खात्यात थेट उपअधीक्षकपदाचा प्रश्‍न सध्या भिजत पडला आहे. ही भरती करण्यासाठीची फाईल गृह खात्याकडे पडून आहे. मात्र, त्यावर अजून कोणताच निर्णय झालेला नाही. ही थेट भरती प्रलंबित असताना रिक्त असलेल्या पाच अधीक्षकांच्या पदासाठी बढती मिळण्यासाठी पात्र असलेल्या या पाच अधिकाऱ्यांच्या नावे पोलिस खात्याकडून क्लिअर करून सरकारकडे पाठवण्यात आल्यास महिना उलटून गेला आहे. ही बढती व बदल्या लॉकडाऊनच्या कचाट्यात सापडल्याने बढतीसाठी उत्सुक असलेले अधिकाऱ्यारी मात्र नाराज आहेत.
पोलिस अधीक्षक बढतीसाठी विद्यमान उपअधीक्षक सेमी तावारिस, सेराफिन डायस, महेश गावकर, लॉरेन्स डिसोझा तसेच गजानन प्रभुदेसाई हे पात्र आहेत. खात्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून अधीक्षकपदाच्या पाच जागा रिक्त आहेत. मात्र, तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे ही फाईल पुढे सरकलीच नाही. त्यावेळी अनेकांनी बढतीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात सफलता मिळाली नव्हती. बढतीसाठीची फाईल सध्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहचली. मात्र, लॉकडाऊनचा अडथळा आल्याने या अधिकाऱ्यांना आणखी काही दिवस बढतीच्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, या पाच अधिकाऱ्यांना बढती मिळाल्यानंतर अधीक्षकपदाच्या अधिकाऱ्यांमध्ये राज्यात फेरबदल होणार आहेत. त्यामध्ये आयपीएस व जीपीएस पोलिस अधीक्षकांचाही समावेश आहे. सध्या खात्यातील एका अधीक्षकाकडे दोनपेक्षा अधिक विभागांचा अतिरिक्त ताबा आहे. अधीक्षकपदी पाच उपअधीक्षकांची बढती झाल्यानंतर ही पोकळी भरून काढण्यासाठी थेट उपअधीक्षक भरती प्रक्रिया सरकार सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

संबंधित बातम्या