‘कोरोना’बाबत एमपीटी सतर्क

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

सागरी पर्यटन हंगामातील २३वे विदेशी पर्यटक जहाज ‘सेलेब्रीटी कॉन्स्टेलेशन’ आज मुरगाव बंदरात विविध राष्ट्रातील देशी विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले. जहाजातून मुरगाव बंदरात उतरताच पर्यटकांची स्कॅनर मशीनद्वारे तपासणी करून ‘कोरोना’ या जीवघेण्या रोगाविषयी निदान करण्यात आले.

दाबोळी: सागरी पर्यटन हंगामातील २३वे विदेशी पर्यटक जहाज ‘सेलेब्रीटी कॉन्स्टेलेशन’ आज मुरगाव बंदरात विविध राष्ट्रातील देशी विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले. जहाजातून मुरगाव बंदरात उतरताच पर्यटकांची स्कॅनर मशीनद्वारे तपासणी करून ‘कोरोना’ या जीवघेण्या रोगाविषयी निदान करण्यात आले. सर्व पर्यटकांकडून उत्तमरित्या सहकार्य मिळाल्याचे जे एम बक्‍सी तसेच एमपीटीच्या आरोग्य विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

सध्या कोरोना या जीवघेण्या रोगाने चीनमध्ये थैमान घातले असून यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. या जीवघेण्या रोगाच्या भीतीपोटी संपूर्ण राष्ट्रांनी आपली विमान वाहतूक चीनमध्ये जाण्यास बंद केली आहे. तसेच चीनमध्ये असलेल्या आपापल्या देशाच्या नागरिकांना खास विमान वाहतुकीद्वारे मायदेशी आणण्यात आले व त्याची आरोग्याच्या दृष्टीने कसून तपासणी करण्यात आली. चीनमध्ये फैलावलेल्या या कोरोना रोगाचा सर्वच राष्ट्रांनी धसका घेतला असून या रोगाचा आपल्या देशात फैलाव होऊ नये यासाठी विमानतळ म्हणा, रेल्वे, रस्ता वाहतूक या सर्वच ठिकाणी विदेशी नागरिकांची कसून डॉक्‍टराद्वारे स्कॅनरमधून तपासणी केली जाते व जर या रोगाची लागण झाल्यास त्यांना उपचारासाठी इस्पितळात पाठवण्यात येते.

दरम्यान, सागरी पर्यटन हंगामा सध्या तेजीत सुरू असून ऑक्‍टोबर २०१९ मध्ये सुरू झालेल्या या सागरी पर्यटन हंगामातून आजपर्यंत सुमारे २५ हजाराहून अधिक देशी विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यात दाखल झाले तर आज मुरगाव बंदरात ‘सेलेब्रीटी कॉन्स्टेलेशन’ हे विदेशी पर्यटक जहाज सुमारे तीन हजार देशी विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्यातील मुरगाव बंदरात दाखल झाले. यात यु.के (८५८), युएसए (३१३), कॅनडा (४०५), ऑस्ट्रेलिया (८०) आदी राष्ट्रातील मिळून १९९४ प्रवासी पर्यटक म्हणून दाखल झाले. तसेच फिलिपाईन्स (२२६), भारतीय (१९४), इंडोनेशियन (१५८), युक्रेन (३१), मॉरिसिस (२५) आदी राष्ट्रातील मिळून ९६२ या जहाजावरील कर्मचारी पर्यटक म्हणून दाखल झाले.

वैद्यकीय अधिकारी तैनात

दरम्यान, मुंबईहून आज गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झालेल्या या जहाजावरील सर्व पर्यटकांची इलॅण्डींग कार्डद्वारे जहाजातून मोकळीक करण्यात आल्यानंतर त्यांची एमपीटीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना रोगाची लागण आहे की नाही या विषयी स्कॅनरद्वारे तपासणी केली. यावेळी दोन रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. तसेच कंदबा बस तैनात ठेवली होती. तपासणी कारणास्तव पर्यटकांना भ्रमंती जाण्यासाठी ११ वाजले मग संध्याकाळी सदर जहाज पर्यटकांना घेऊन कोचीनला रवाना झाले.
 

संबंधित बातम्या