महापालिकेने गटारांची साफसफाई घेतली हाती

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

पणजीत चार महिने अगोदरच
मॉन्सूनपूर्व कामांना प्रारंभ

शहरातील गटारांची साफसफाई करताना महापालिकेचे कर्मचारी.

पणजी : पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी मॉन्सूनला अद्याप चार महिने बाकी असतानाच गटारांची साफसफाई करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.

महापालिकेने शहरातील अनेक ठिकाणच्या गटारांच्या साफसफाईला सुरवात केली आहे. याबाबत विचारणा केली असता महापौर उदय मडकईकर म्हणाले की, मनॉ्सून सुरू होण्यापूर्वी कामे करण्यास कर्मचारी मिळत नाहीत. प्रत्येक प्रभागात नगरसेवकांकडून कर्चमाऱ्यांची मागणी होते.आत्तापासून साफसफाई केली, तर पुढे मोठ्या प्रणामात गटारे तुंबण्याचे प्रकार घडणार नाहीत.

जी गटारे साफ करण्यात आली आहेत,पावसापूर्वी काही दिवस अगोदर पुन्हा त्यांची पाहणी केली जाईल, जर त्यात कचरा असेल तर तेवढीच गटारांची सफाई करण्यास कामगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात.

शहरात पाणी साचल्यानंतर काय अवस्था होते, हे आम्हालाही माहीत आहे.गटारांचे पाणीही दुकानांतून गेल्याच्या घटना घडल्याने अनेक दुकानदारांनी महापालिकेकेड तक्रारी दाखल केल्या आहेत.

दुकानदारांना पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे त्रास होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. ज्या ठिकाणी गटारांवरील सिमेंटच्या लाद्या मोडल्या आहेत त्याही बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. जेवढ्या ठिकाणी शक्य आहे, तेथे लाद्या टाकण्यास निरीक्षकांना सांगण्यात आल्याचे मडकईकर म्हणाले. सफाई कामगारांतील ६० च्यावर कामगार आता कायमस्वरूपी करण्यात आले आहेत, त्या कर्मचाऱ्यांनीही शहर स्वच्छतेला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाची कामे हाती घेतली असल्याचे मडकईकर म्हणाले.

 

संबंधित बातम्या