हा तर लोकशाहीचा खून, सुडाचे राजकारण

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

 हे तर धर्मांध सरकार

सभापतींनी दिलेल्या अटकेच्या परवानगीवर विरोधकांच्या परखड प्रतिक्रिया

अधिवेशनाच्या तीन दिवसांच्या कामकाजावेळी भाजप सरकारच्या अपयशाबाबतचा पर्दाफाश विरोधकांनी वारंवार केल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त आहेत. विरोधकांनी त्यांची कतृत्वे उघड करण्याचे काम विधानसभेत केली.

 

पणजी :  अधिवेशन सुरू असताना आमदार रोहन खंवटे यांना अटक करण्याची सभापतींनी पोलिसांना परवानगी देत लोकशाहीचा खून केला आहे. भाजप सरकारने वैयक्तिक स्तरावर सुडाचे राजकारण करण्यास सुरू केले आहे. पोलिसांत दिलेली तक्रार खोटी आहे. गोव्यात हुकूमशाहीने प्रवेश केला आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया सभापतींच्या कृतीबाबत विरोधी आमदारांनी व्यक्त केल्या आहेत.

मी सुद्धा मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यांच्या कामाची लक्तरे काढल्याने मला चेतावून अटक करण्याचा पूर्वयोजना ठरली असण्याची शक्यता आहे. भाजप नेहमीच चार प्रकार करतात. पहिल्यांदा ते पत्रकार परिषद घेतात, आरोप करतात, अटक करतात व पुतळा जातात. त्यांचे हे नेहमीचे आहे. मी म्हांबरे यांना चांगले ओळखतो व मंत्री असताना त्यांच्याबरोबर काम केले आहे. त्यामुळे ते विधानसभा संकुलात संध्याकाळी भेटले तेव्हा आरोप केले याबाबत मिस्किलपणे विचारले. मात्र त्याचा परिणाम एवढा मोठा होईल असे वाटले नव्हते. आम्ही सर्व दहा आमदार एकत्र आलो हे सरकार खटकले. कितीही त्रास दिला तरी लोकांच्या समस्या व सरकारच्या अपयशाचा पर्दाफाश करणे सुरूच राहणार आहे. असे खंवटे म्हणाले.

अधिवेशन सुरू असताना घरातून मध्यरात्रीच्या सुमारास अटक करणे ही गंभीर बाब आहे. मी एवढा मोठा कोणता गुन्हा केला होता की त्यासाठी तातडीने रात्रीच्यावेळी अटक करावी लागली. सरकारने पोलिसांवर दबाव आणून ही कारवाई करण्यास लावले आहे. मला अटक करून अधिवेशनातील सरकारच्या अपयशाचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला गेला आहे मात्र लोकशाहीत हे मान्य नाही. याला गोमंतकिय उत्तर देतील. मला अटक झाल्यानंतर लोकांनी फोन करून या लढ्यासाठी पाठिंबा दिला आहे. ज्या प्रकारे ही घटना घडवून आली त्यावरून हे पूर्वनियोजित होते असे दिसून येते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास मुख्यमंत्री जबाबदार आहेत. मला अटक करण्याची परवानगी देण्यापूर्वी सभापतींनी विधानसभा संकुलात असलेल्या सीसी टीव्ही कॅमेरात त्याची शहानिशा करण्याची गरज होती. मात्र तटस्थपणा दाखविण्याऐवजी ते पक्षाबरोबर वाहत गेले अशी प्रतिक्रिया आमदार खंवटे यांनी व्यक्त केली.

राज्यामध्ये सूडाचे राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार खंवटे यांच्यावर केलेले आरोप पाहून त्यांना वकिलाची तयारी कर असे सूचित केले होते. २००१ साली तामिनळनाडूचे करुणानिधी व दोन केंद्रीय मंत्र्यांना रात्रीच्यावेळी अशाच प्रकारे अटक झाली होती. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री गोव्याचे तामिळनाडू करू पाहत आहे व तेथील संस्कृती गोव्यात प्रवेश करत आहे. गोव्यातील लोकशाही मरण पावली आहे. आमदारांना अटक करून हे सरकार भीतीचे वातावरण निर्माण करत आहे मात्र आम्ही त्याला घाबरत नाही. वैयक्तिक सूड काढण्यासाठी सभापतींच्या कार्यालयाचा गैरवापर केला जात आहे. आमदार खंवटे यांच्याविरुद्धचा गुन्हा जामीनपात्र होता त्यासाठी मध्यरात्री त्यांच्या घरी जाऊन व उठवून अटकेची आवश्‍यकता नव्हती. मुख्यमंत्री हे ‘कावबॉय’ झाले आहेत अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

अधिवेशन काळात आमदाराला
अटक करणे ‘अलोकशाही’

अधिवेशन काळात आमदार खंवटे यांना अटक होणे हा अलोकाशाहीचा मार्ग आहे. सभापतींनी अटकेची परवानगी देण्यापूर्वी त्यांना बाजू मांडण्याची संधी देणे आवश्‍यक होते. जो प्रकार विधानसभा संकुलाच्या आवारात घडला त्यावेळी खंवटे याच्या पुढे मी चालत होतो तर त्यांच्यासोबत आमदार प्रतापसिंह राणे होते. त्यामुळे धमकावण्याचा किंवा मारहाणीचा प्रकार घडलाच नाही. विरोधकांविरुद्धचे हे सरकारचे षडयंत्र आहे. आदल्या दिवशी माझ्यावरही भाजपने आरोप केले होते अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.

कार्यकर्त्याच्या तक्रारीनुसार
आमदारा अटक करणे गैर

अधिवेशन सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीनुसार ज्येष्ठ आमदारांना अटक करणे ही गोष्ट लज्जास्पद आहे. जर हे सरकार सत्तेवर राहिल्यास काय होऊ शकते हे आता लोकांनीच विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत या भाजपला त्यांची जागा लोकांनी दाखवण्याची वेळ आली आहे असे मत आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. आमदार रोहन खंवटे यांनी भाजपचे कार्यकर्त्याला हटकले व घटना घडली तेव्हा मी त्यांच्या सोबत होतो. त्यामुळे तक्रारीत जे काही नमूद करण्यात आले आहे तसे काही घडलेच नाही. त्यामुळे ही खोटी तक्रार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी आमदार प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केली.

:

संबंधित बातम्या