मुरगाव नगरपालिकेची आर्थिक स्थिती दयनीय

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन सुमारे सव्वा कोटी रुपये होत आहे. तेव्हढी रक्कम तिजोरीत नसल्याने कायम ठेवीतून वेतन देण्याची पाळी पालिकेवर आली आहे.

मुरगाव

 मुरगाव नगरपालिकेची सध्या आर्थिकदृष्ट्या परवड झाली असून कामगारांना वेतन घालण्याएव्हढे पैसे नसल्याने आता पुढे काय करायचे या विवंचनेत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी सापडले आहेत. याखेपेसही कायम ठेवीतील पैशांतून कामगारांचे वेतन पालिकेला द्यावे लागणार आहे.
वास्कोतील मुरगाव बंदराला लागून असलेली जागा मुरगाव पालिकेने इंधन कंपन्यांना भाडेपट्टीवर दिली आहे. तथापि ह्या कंपन्या वेळेवर भाडे देत नसल्याने सात-आठ कोटी रुपये पडून राहिले आहेत. तोच प्रकार गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या सहकार भांडाराचा आहे. त्यांच्याकडून ८० लाख रुपये पालिकेला देणे आहे. पालिका इमारतीत असलेल्या सरकारी कार्यालयाकडून सुमारे २५-३० लाख रुपये भाडेपोटी मिळायचे आहे,तेही दिले जात नाही. कोसंबे , मुकुंद, बॉर्जीस या पालिकेच्या मालकीच्या इमारतीमधील भाडेकरु कडून ८-१० कोटी रुपये मिळायचे आहे. हॉस्पिसियो इमारत,आणि इतर मालमत्तेतून ४-५ कोटी रुपये पालिकेला मिळायचे आहे, पण कोणीच देत नसल्याने पालिकेची मिळकत कमी होऊन खर्च बेसुमार वाढला आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन जारी केल्याने पालिकेला मिळणारे उत्पनही थकले आहे. मार्च-एप्रिल या महिन्यात पालिकेची तिजोरी सदैव भरलेली असायची, पण या खेपेस कोरोनाने दगाफटका दिला. कर्मचाऱ्यांना वेतन कसे द्यायचे हा जटील प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना सतावत आहे. मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन सुमारे सव्वा कोटी रुपये होत आहे. तेव्हढी रक्कम तिजोरीत नसल्याने कायम ठेवीतून वेतन देण्याची पाळी पालिकेवर आली आहे.

संबंधित बातम्या