मुरगाव पालिकेला शताब्दीचा विसर

Dainik Gomantak
सोमवार, 30 डिसेंबर 2019

पालिकेचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करणाऱ्या मुरगाव पालिकेला या सोहळ्याचा पूर्णपणे विसर पडला आहे.

बाबूराव रेवणकर

मुरगाव

 २०१९ हे वर्ष मुरगाव पालिकेचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करणाऱ्या मुरगाव पालिकेला या सोहळ्याचा पूर्णपणे विसर पडला आहे. आज मंगळवारी वर्षांचा अखेरचा दिवस आहे.
मुरगाव पालिकेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त पुढे करून पालिकेने अनेकांकडून लाखो रूपये देणगी घेतली. पण, शताब्दी वर्षातील शुभारंभाचे चार दिवस कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात केल्यानंतर पालिकेने गेल्या दहा महिन्यांत एकही कार्यक्रम केला नाही. वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे अभिवचन देऊन लाखो रुपये देणगीरुपाने घेतले होते. मात्र, त्‍या पैशांचा वापर कुठे झाला, असा प्रश्‍‍न मुरगाववासीय उपस्‍थित करीत आहेत.
पालिकेच्या दप्तरात शताब्दी महोत्सवानिमित्त ३८ लाख ५० हजार रुपयांची देणगी मिळाल्याची नोंद आहे. त्यातील ३६ लाख रुपये चार दिवसांच्या उद्‍घाटनीय कार्यक्रमावर खर्च केल्‍याचे आढळून आले आहेत. शिल्लक अडीच लाख रुपयांमध्ये सांगता सोहळा आयोजित करणे शक्य नसल्याने शताब्दी वर्षाचा सांगता सोहळा न करण्‍याचा पालिकेने निर्णय घेतल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्‍यान, सांगता सोहळा विविध कार्यक्रमांसह आयोजित करण्याचा मानस नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी व्यक्त केला होता. पण, पैसेच नसल्याने तेही हतबल झाले आहेत. शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी मिळविलेल्या देणगीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनीही चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. पण, आजपावेतो काहीच झाले नाही. सर्वजण मूग गिळून गप्प बसले आहेत, अशी चर्चा लोकांत सुरू आहे.

संबंधित बातम्या