पर्यटनाच्या नावावर...

Dainik Gomantak
बुधवार, 1 जानेवारी 2020

गोव्यातील अमलीपदार्थ व्यवहाराचा कणा मोडून काढण्याचा संकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला असला आणि अमलीपदार्थ व्यवहाराला आळा बसला असल्याचे कितीही सांगितले तरी अमलीपदार्थांचा साठा सापडण्याचे काही कमी होत नाही. पर्यटन वृध्दिसाठी गोव्यात पर्यटकांच्या आवडीनिवडी जपताना काही वाईट गोष्टीही पर्यटनाबरोबर आपसुकच आल्या. पर्यटन विकास व्हावा या आशेने सुरवातीला अशा वंगाळ गोष्टींकडे सरकारने केलेले दुर्लक्ष आता महागात पडू लागले आहे. जगाच्या नकाशावर मोठ्या ऐटीत आम्ही पर्यटन राज्य म्हणून मिरवतो. मात्र दुसऱ्या बाजूने गोव्याची बदनामीही तेवढीच होत आहे.

गोव्यातील अमलीपदार्थ व्यवहाराचा कणा मोडून काढण्याचा संकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला असला आणि अमलीपदार्थ व्यवहाराला आळा बसला असल्याचे कितीही सांगितले तरी अमलीपदार्थांचा साठा सापडण्याचे काही कमी होत नाही. पर्यटन वृध्दिसाठी गोव्यात पर्यटकांच्या आवडीनिवडी जपताना काही वाईट गोष्टीही पर्यटनाबरोबर आपसुकच आल्या. पर्यटन विकास व्हावा या आशेने सुरवातीला अशा वंगाळ गोष्टींकडे सरकारने केलेले दुर्लक्ष आता महागात पडू लागले आहे. जगाच्या नकाशावर मोठ्या ऐटीत आम्ही पर्यटन राज्य म्हणून मिरवतो. मात्र दुसऱ्या बाजूने गोव्याची बदनामीही तेवढीच होत आहे. पर्यटकांची सुरक्षा, अमलीपदार्थांचा विळखा, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय असे बरेच काही लौकिकाला काळिमा फासत आहे. संगीत नृत्य रजनींच्या नावाखाली म्हणे अमलीपदार्थांचे व्यवहार होतात. अमलीपदार्थ प्राशन केले जातात. पण ही बाब कर्तव्यदक्ष(?) पोलिसांच्या नजरेत येत नाही. किनारी भागातील ही थेरं आता शहरात आणि पार ग्रामीण भागातही पोचली आहेत. यामुळे गोव्याचे भवितव्य काय, असा प्रश्‍न कोणी काळजीपोटी विचारला तर त्याचे काही चुकले असे म्हणता येणार नाही.
गेली काही वर्षे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सनबर्न महोत्सव भरतो. देश-विदेशातील हजारो तरुण-तरुणी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी येतात. नृत्यमहोत्सव म्हणून सनबर्न महोत्सवाची जाहिरात केली जात असली तरी तिथे भलतेच चालते, असा आरोप दरवर्षी होत असतो. आताही तिघांचा मृत्यू याठिकाणी झाला. अमलीपदार्थांचे अतिप्राशन केल्याने त्यांच्यावर प्राण गमावण्याची वेळ आली, अशी सर्वत्र चर्चा असली तरी खात्रीशीर असा पुरावा देणारा शवचिकित्सा अहवाल काही हाती लागत नाही. मागील काही वर्षांत पण या महोत्सवात काहीजण मृत्युमुखी पडले होते. त्याची कारणे काही वेगळी होती, असे लोकांना वाटत नाही. पण सरकारी यंत्रणा याबाबत काहीच करू शकलेली नाही. लोकांना त्या ठिकाणी अमलीपदार्थांचा वापर होत असल्याचे कितीही वाटत असले तरी तसा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागत नाही...(?) पोलिसांच्या नाकावर टिच्चून सारे काही होत असल्याची टीका चोहोबाजूंनी होत असते. मुळातच असे वादग्रस्त महोत्सव आयोजित करण्यास देऊन गोव्याची बदनामी करवून का म्हणून घ्यायची? प्रत्येकवेळी अशा महोत्सवाला परवानगी देणार नाही, असे पर्यटनमंत्र्यांनी जाहीर करायचे आणि हे शब्द हवेत विरतात न विरतात तोच आवश्‍यक परवानगी देऊन मोकळे व्हायचे. असे सर्रासपणे घडत आले आहे. यामुळे ‘अंदर की बात’ काय आहे ते समजणारे समजून जातात. यावेळीसुध्दा तांत्रिक कारणावरून या महोत्सवाच्या परवानगीचे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले. नंतर परवानेही मिळाले. सरकारची परवानगी नसतानाही या महोत्सवाची खुलेआम तिकीट विक्री होते, हाही एक विक्रमच. हे सारे कोणाच्या भरोशावर होते. सरकारची कृपा असल्याशिवाय तसे होणार नाही. म्हणूनच नाही नाही म्हणत परवानगी देऊन संबंधित यंत्रणा मोकळी होते. पुढे मग अमलीपदार्थ व्यवहाराचा आरोप, कोणाचा मृत्यू हे सारे काही या पानावरून पुढे चालू असे जणू ठरलेले. महोत्सव आयोजनात मिलीभगत असल्याशिवाय आयोजक काही पुढे पाऊल टाकणार नाहीत.
सनबर्न महोत्सवात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर तर या महोत्सवाविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षांनी पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांच्या राजीनाम्याची मगणी केली. परवाना प्रक्रियेची चौकशी करण्याचा आग्रहही धरला. पण त्याच महोत्सवात पर्यटनमंत्री आजगावकर जाऊन नाचतात, याला काय म्हाणायचे? दोघांच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असताना आणखी एक जण मरण पावला. त्यामुळे या महोत्सवात मृत्यू पावणाऱ्यांविषयी गूढ निर्माण झाले आहे, असे म्हणून लोकांनी गप्प बसायचे, असे जर सरकारला वाटत असेल तर ते योग्य नाही. या महोत्सव स्थळी सहभागी तरुण तरुणी खास ‘पेपर’ची मागणी करताना आढळून येतात. ते नेमकी कशाची मागणी करतात याची शहानिशा पोलिसांनी करायला हवी. पण पोलिसांनाही गुंगारा देऊन हे होतेय यावर विश्‍वास कसा ठेवायचा? अमलीपदार्थांबाबत लोकांनी माहिती मिळाल्यास पोलिसांना ती कळवायचे आवाहन केले जाते. पण हेच पोलिस नाव गुप्त ठेवणार याची हमी कोण देणार? यातील काही पोलिसांचे अशा गैरव्यवहारात गुंतलेल्यांबरोबर सख्य असते. यापूर्वी काही पो.िलस अधिकाऱ्यांनाही अशा प्रकरणात अटक झालेली आहे. जुगाराविषयी माहिती पुरवणाऱ्यांची नावे जुगार चालवणाऱ्यांना सांगणारे पोलिस अमलीपदार्थाविषयी माहिती दिली तर नावे सांगितल्याशिवाय राहणार यावर कोणाचाही विश्‍वास नाही.
अमलीपदार्थांमुळे युवा पिढी बरबाद होत असल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्षांनी आजवर केला आहे. पण सत्तेत येताच या पक्षांनी भूमिका बदलली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कसिनो हे एक माध्यम असल्याचा खुलासा वारंवार करून सरकार पक्षाने आणि पर्यटनमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनीही आपण कसिनोंचे समर्थन करत असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यासाठी ते देत असलेली उदाहरणे पटण्यासारखी असली तर आपल्या युवा पिढीचे नुकसान होत आहे. व्यसनाच्या आहारी ही पिढी जात आहे याकडे कानाडोळा करून कसे चालेल? पर्यटकांना आवडणारा गोवा आता पयर्टकांसाठी सुरक्षित राहिला नाही, असे चित्र विदेशात तयार केले गेले आहे. पर्यटकांवर होणारे बलात्कार, लूट यामुळे गोव्याकडे पर्यटक पाठ फिरवित आहेत. एका बाजूने आम्हाला चांगले पर्यटक हवेत म्हणून सांगायचे आणि दुसऱ्या बाजूने पर्यटनाच्या नावाखाली धिंगाणा घालायचा याला काही अर्थ नाही. किनारी भागात सुरू असलेले गैरधंदे नजरेआड करून चालणार नाहीत. अमलीपदार्थ व्यवहाराचा विळखा गोव्याला बसला आहे असे खुद्द सरकार पक्षाचे आमदार यापूर्वी म्हणायचे. आता गोवा फॉरवर्डचे शिवोलीचे आमदारही अमलीपदार्थ व्यवहार वाढल्याचा आरोप करत आहेत. विरोधात असल्याने ते बोलतात असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वस्तुस्थिती काय आहे हे सरकारला आणि पोलिसांनाही चांगलेच माहीत आहे. पण, महाभारतातल्या गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधून कारभार चालवला तर मग ‘अंधेर नगरी, चौपट राजा’ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. रोडावलेल्या पर्यटन क्षेत्राला गतवैभव प्रात्त करून द्यायचे असेल तर निश्‍चित असे पर्यटन धोरण आखायला हवे. केवळ पर्यटनातून महसूल मिळवणे हाच उद्देश असेल तर ते गैर आहे. गोव्याच्या अस्मितेची किंमत मोजून पर्यटनाच्या नावाखाली काहीही खपवून घेऊ नये. पुढील पिढी बरबाद होण्यापासून आणि गोव्याचा लौकिक राखण्यासाठी काहीतरी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. पैसा हे सर्वस्व नाही. म्हणूनच सरकराने आतातरी गांभीर्याने विचार करून पर्यटनाच्या नावाखाली गोव्याचा ऱ्हास होऊ देता कामा नये.

संबंधित बातम्या