नाना आणि हॉटेलातली कांदाभजी

विजय कापडी
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

 टंंगळ मंगळ

सकाळी सकाळी नानांची भेट होऊ शकली नाही, त्यामुळे मी त्यांना टळटळीत दुपारच्यावेळी म्हणजे साडेबारा वाजता भेटायला गेलो. नाना नुकतेच बाहेरून आलेले दिसले. पण नानांचा त्यावेळचा मूड वेगळाच दिसला.

संपादकीय सदर :नानांच्या डोळ्यांतून धगधगीत निखारे बाहेर पडताना दिसले. फार मोठ्या प्रमाणात त्यांचं बिनसलं असावं. त्यांचा क्षणाक्षणाला अधिकच भडकू पाहणारा राग शांत करण्यासाठी मी विचारलं, ‘‘नाना, आज तुम्ही साक्षात जमदग्नी ऋषीप्रमाणं क्रोधित दिसताहात. काय झालं? आणि स्वयंपाकघराच्या दिशेने नजर टाकीत अगदी हलक्या आवाजात विचारलं, नानींबरोबर खडाजंगी झाली काय? नेमक्या त्या क्षणी स्वयंपाकघरातलं एक मोठं जोरात वाजलं. त्यामुळे आता आपली काही खैर नाही म्हणून मी काढता पाय घेण्याच्या विचारात असतानाच नानांनी खुलासा केला, ‘अरे, नानींशी नाही, पण शहरातल्या हॉटेलवाल्याशी खडाजंगी झाली.’

मी ः काय? हॉटेलवाल्याशी खडाजंगी? ती का म्हणून?
नाना ः अरे, मला आज सकाळी कांदाभजी खाण्याची जबरदस्त इच्छा झाली म्हणून मी माझ्या नेहमीच्या हॉटेलात गेलो. तिथल्या वेटरला ‘एक प्लेट कांदाभजी’ अशी आॅर्डर तर त्यानं माझं लक्ष हॉटेलातल्या एका फळकाकडं वेधवलं. त्यावर मोठ्या अक्षरात चक्क लिहिलं होतं. ‘आमच्याकडं कांदाभजीची ऑर्डर घेतली जाणार नाही क्षमस्व...’ त्या सरशी मी ताडदिशी उठून उभा राहिलो आणि तरातरा चालत हॉटेलातून बाहेर आलो. आणि तेथून अवघ्या पन्नास पावलांच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या हॉटेलात गेलो. मघासचा अनुभव जमेस धरून आत प्रवेश घेतल्यावर खुद्द गल्ल्यावरच्या मालकालाच प्रश्‍न केला. तुमच्याकडं कांदा-भजी तळायला घेतात काय? यावर त्या बेकार मालकानं जोरजोरानं नकारार्थी मान हलवली आणि तेवढ्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडणार नाही म्हणून मोठ्यांदा म्हणाला, ‘आधी कांद्याचे भाव खाली आणायला सरकारला सांगा... कांद्याचे भाव कमी झाल्याशिवाय कांद्याची भजी तळायला घेणे तर सोडाच पण कांदा कापायलाही घेणार नाही!’ म्हणजे तुमच्याकडं कांदाभजी मिळणार नाही तर, हा मी चाललो! असं बाणेदार आवाजात त्याला ऐकवून मी तेथून निघालो.

इतक्यात मला आठवलं... अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आणखी एक हॉटेल आहे आणि ते कांदाभजीसाठीच अधिक लोकप्रिय आहे. मी तात्काळ त्या दिशेने मोर्चा वळवला आणि पायांना गती देत अवघ्या काही क्षणांतच त्या हॉटेलात गेलो. तिथल्या मिशाळ मालकालाही मी तोच प्रश्‍न ऐकवला. ‘मला कांदाभजी हवी आहे! मिळतील? तेव्हा हसत-हसत आणि मिशांना पीळ भरत म्हणाला, ‘इतर हॉटेलात जे मिळत नाही ते आमच्याकडे मिळतं. आमच्याकडं कांदाभज्याहून सरस अशी कोबी-कांदा मिक्स भजी मिळतील. चालतील तर आत या.’ मी लगेच शंका काढली. कोबी-कांदा मिक्स भजी? हा प्रकार नवा दिसतोय. पण मला सांगा. कोबी आणि कांदा यांच्या मिश्रणाचे प्रमाण काय? या माझ्या प्रश्‍नावर अधिकारवाणीच्या सुरात तो म्हणाला, एका कोबीच्या गड्याला अर्धा कांदा! ‘हॅट’, अशाप्रकारची मिक्स भजी तुम्हालाच लखलाभ होवोत. मला हवीत ती प्युअर कांदाभजी! असं ऐकवून मी पुढच्या हॉटेलाच्या दिशेनं निघालो. तर तिथंही तीच रड. सकाळची वेळ पुढं पुढं सरकत होती आणि कांदाभजी न मिळाल्यानं माझी आतडी

तटातटा तुटायच्या वाटेला लागली होती. माझी ती अवस्था पाहून एक सज्जन माझ्या जवळ आला आणि म्हणाला ‘तुम्हाला कांदाभजी खावीशी वाटतात ना? त्या तिथं नुकतंच एक नवं हॉटेल सुरू झालंय. तिथं तुम्हाला कांदाभजी निश्‍चितच मिळतील. वाट्टेल तेवढी खा...’ क्षणार्धात मी त्या दिशेनं निघालो... आत शिरल्या शिरल्या खुद्द मालकानंच मला प्रश्‍न केला. ‘कांदाभजी खायला आलात ना? या!

आणि मी आतल्या टेबलाजवळच्या खुर्चीवर बूड टेकवणार तेवढ्यात पोऱ्याला ऑर्डर ऐकवली, ‘अरे, साहेबांना एक प्लेट कांदाभजी आणून दे! पोऱ्या धावतच आतल्या दिशेनं गेला. त्याच गतीनं माझ्या दिशेनं धावत आला आणि माझ्या पुढ्यात कांदाभजीची प्लेट आपटवली. प्लेटीत एकच कांदाभजं पाहून मी विचारलं, ‘काय एकच भजं?’ ‘अहो, तळायला घेतलीत भजी. आधी खाऊन तर पहा, मी भजं मटकावलं... तेवढ्यात एकाच भजीची दुसरी प्लेट आली. ते गिळेपर्यंत... तिसरी प्लेट... चौथी.. पाचवी प्लेट... पण एकच भजी असलेली! पाचही भजी खावून आणि मी हातात वीस रुपयांची नोट घेऊन कांऊंटरपाशी गेलो. तो मालक म्हणाला, पाच प्लेट भजी खाल्लीत ना? शंभर रुपये काढा! अहो, दहा ते बारा रुपये किलो कांदा होईपर्यंत आमच्याकडं हाच रेट राहील... एका प्लेटीत एकच भजं आणि किंमत वीस रुपये! काढा पैसे! माझं डोकंच आऊट झालं! शंभर रुपये देऊन मी आताच आलोय. अशा प्रसंगी माझं डोकं भडकणार नाही काय?
मी होकार दिला!

संबंधित बातम्या