नववर्षात नाफ्‍ता संकट टळले

Dainik Gomantak
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

पंपाद्वारे हा साठवून ठेवलेला नाफ्ता जहाजात भरण्यात येत आहे. बुधवार १ जानेवारीपर्यंत गणेश बेंजो प्लास्टमधील नाफ्ता खाली करण्यात येईल. 

बाबूराव रेवणकर

मुरगाव

नववर्षाच्‍या प्रारंभ बहुचर्चित २३०० मेट्रिक टन नाफ्‍ता जहाजातून नेण्‍याची प्रक्रिया सुरू झाल्‍याने संकट टळले आहे. ग्लोबल पीक हे नाफ्तावाहू जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले असून नाफ्‍ता त्‍या जहाजात भरण्‍यास सुरवात झाली आहे. पंपाद्वारे हा साठवून ठेवलेला नाफ्ता जहाजात भरण्यात येत आहे. उद्या बुधवार पर्यंत गणेश बेंजो प्लास्टमधील नाफ्ता खाली करण्यात येईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जेटी बोगदा येथील गणेश बेंजो प्लास्टमध्ये साठवून ठेवलेला नाफ्ता रस्तामार्गे वाहून नेण्यास काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी केलेला तीव्र विरोध फळास आला आहे. २३०० मेट्रिक टन नाफ्ता जहाजातून वाहून नेले जाणार आहे. त्यासाठी पाकिस्तानातून नाफ्ता घेऊन आलेली नू शी नलिनी हे जहाज कोची बंदर नजीक अपघातग्रस्त झाल्यावर ते जहाज दुरुस्तीचे कारण पुढे करून मुरगाव बंदरात आणले होते. १७ जुलै २०१९ रोजी मुरगाव बंदरात धक्का क्रमांक ८ येथे आणून त्या जहाजातील नाफ्ता खाली करण्यासाठी प्रयत्न सुरू झाला. पण, कस्टमने सीमा शुल्क २०० टक्के अगोदर भरा, त्यानंतरच नाफ्ता खाली करा, असे बजावले होते. त्या जहाजातील नाफ्ता जेटी बोगदा येथील गणेश बेंजो प्लास्टमध्ये साठवून ठेवण्याची हालचाल एमपीटीने चालवितर मंत्री मिलिंद नाईक यांनी तीव्र विरोध केला होता.

एकही पैसा खर्च न करता
विघ्‍न टळले : मुख्‍यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, नाफ्त्याचे संकट आता टळले आहे. राज्य सरकारने एकही पै खर्च न करता हे काम केले आहे. यापूर्वी रिव्हर प्रिन्सेस हे जहाज फुटल्यानंतर ते हटवण्यासाठी राज्य सरकारने ७० कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर अजूनही त्या जहाजाचे अवशेष सापडत आहेत. या विषयावर टीका करणारे सरकारची दिशाभूल करून सरकारला पैसे खर्च करण्यास भाग पाडत होते. मात्र, सरकारने याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून जहाज हटवून घेतले व नाफ्ताही नेण्यास भाग पाडले. सरकारने संयमपूर्वक हे काम केल्याने यश मिळाले आहे. सरकारने याप्रकरणी चालढकल चालवल्याचा आरोप करणाऱ्यांना आता योग्य असे उत्तर मिळाले आहे.

संबंधित बातम्या