म्हापशातील जिल्हा इस्पितळाचा दर्जा वाढविणे गरजे

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

जिल्हा इस्पितळ (पुर्वीचे आझिलो)

औषधगोळ्याचा तुटवडा, स्वच्छतेची एैशीतैशी, अपुरे कर्मचारी

या इस्पितळाला भेट दिली असता येथे अनेक गैरसोयी निदर्शनास आल्या. दिवसाकाठी हजारभर रुग्ण दैनंदिन उपचार करून घेण्यासाठी येथील इस्पितळाला भेट देत असतात त्यात जवळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

शिवोली : बार्देश तालुक्यातील किंबहुना उत्तर गोव्यातील बार्देशपासून डिचोली आणि सत्तरीपासून पेडणेपर्यंतच्या तालुक्यातील असंख्य रुग्णांचा भार वाहणारे जिल्हा इस्पितळ (पूर्वीचे आझिलो) सध्या अनेक गैरसोयी तसेच अपूऱ्या कर्मचारी वर्गामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.

सकाळी आठनंतर येथील काउंटर खिडकीवर रुग्णांची भलीमोठी रांग लागते. एकूण चार रांगांत विभागणी करण्यात आलेल्या येथील काउंटरवर दरदिवशी सहाशे ते सातशे स्त्री-पुरूष आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी रांगेत उभे असतात तर नव्या काउंटरवर सुमारे दीडशे ते दोनशे रुग्ण नवीन नाव नोंदणीसाठी प्रतीक्षेत असतात. सकाळी साडेआठ वाजता येथील नाव नोंदणी काउंटर सुरू होते ते दुपारी साडेबारा वाजता जेवणासाठी बंद ठेवले जाते तर पुन्हा दुपारी अडीच वाजता सुरू होणारे काउंटर साडेतीनपर्यंत कार्यरत असते.

दरम्यान, सकाळी ते दुपारी मिळून सुमारे सहाशे पन्नास जुने रुग्ण आणि दीडशे ते दोनशे नवीन रुग्णांची नावनोंदणी रविवार सोडल्यास नियमितपणे येथील जिल्हा इस्पितळाच्या काउंटरवर होत असते.
दर शनिवारी अर्धा दिवस आणि सुट्यांच्या काळात येथील नाव नोंदणी काउंटर बंद ठेवले जाते. राज्यातील प्रत्येक रुग्णांसाठी मोफत औषध उपचारांची इस्पितळात सोय असते मात्र पर- राज्यातील रुग्णांना मात्र औषधांची सोय उपलब्ध नसते त्यांना ही सोय बाहेरून घ्यावी लागते . गोव्यातील दीनदयाळ कार्डधारकांना येथील औषधोपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध असल्याचा दावा इस्पितळ प्रशासनाकडून करण्यात आलेला असला तरी त्यांच्या या दाव्यात तितकेसे तथ्य नसल्याचे येथील रुग्णांना भेट दिली असता दिसून आले.

नियमित स्वरूपाच्या गोळ्या तसेच एन्टीबायोटीक्स सोडल्यास महागडी औषधे रुग्णांना बाहेरूनच विकत घ्यावी लागतात, असे येथील महिला वॉर्डात उपचार घेत असलेल्या जयश्री नाईक या महिलेने सांगितले. अनेकदा इंजेक्शनसाठी लागणाऱ्या सिरींजसुद्धा खासगी औषधालयातून खरेदी करावी लागतात, असे अनेक रुग्णांनी सांगितले. त्यामुळे इस्पितळाची व्याप्ती पाहता येथील औषधालयाचा दर्जा वाढविण्यावर आरोग्य खात्याने अधिक भर देण्याची गरज आहे.

जिल्हा इस्पितळाचा चोवीस तास कार्यरत राहणारा केज्युअल्टी (आपत्कालीन) विभागातही येथे सर्व काही सुरळीत नाही. या विभागात अधिक करून अपघातग्रस्त लोकांना आणले जाते परंतु अनेकदा कमी कर्मचारी वर्ग व इतर कारणे पुढे करीत रुग्णांना सरळ बांबोळीला पाठवून दिले जाते,अशा सामान्य रुग्णांच्या वाढत्या तक्रारी आहेत. सध्या येथील इस्पितळात कार्यरत असलेल्या अन्य विभागात फार्मसी, पेथॉलोजी, रेडीओलॉजी, ऑरथॉपेडीक (अस्तीरोग विभाग) पियाड्रीटीक, (बालरुग्ण-विभाग) सायक्रेटीक ( मनोरुग्ण विभाग) प्रसूती विभाग, आदींचा समावेश आहे. सबंध इस्पितळाच्या सोयीसाठी एकूण दोन ऑपरेशन थिएटर कार्यरत आहेत.

त्यापैकी एक डोळ्यांवरील उपचारासाठी तर दुसरे अन्य रुग्णांवरील उपचारासाठी चोवीस तास सेवा देत असते. दरम्यान, या ऑपरेशन थिएटर विभागात एखादा तांत्रिक बिघाड झाल्यास अनेकदा ठरलेल्या शस्रक्रिया पुढे ढकलाव्या लागतात, असाही येथील रुग्णांचा अनुभव आहे. त्यामुळे येथील शस्रक्रिया विभाग सुसज्ज करण्याबरोबरच कार्यक्षमताही वाढविण्याची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त क्षयरोग निदान आणि उपचार कक्ष तसेच एच आय व्ही विभाग नियमित स्वरूपात येथे कार्यान्वित आहे. नवीन लग्नास इच्छुक व्यक्तींना तसेच बाळाला जन्मास घालण्याआधी जोडप्याच्या एचआयव्ही चाचण्या करून घेणे आता बंधनकारक असल्यामुळे हा विभाग याभागात कार्यान्वित असतो. त्याशिवाय क्षयरोग निदान , क्षयरोग चाचण्या तसेच त्यांवरील उपाय योजनाही म्हापशाच्या जिल्हा इस्पितळात स्थानिकांसाठी विनामूल्य उपलब्ध असतात. मात्र, सरकारी इस्पितळातील ही सेवा आठवड्यातील ठरावीक दिवशीच संबंधित रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली जाते.

दरम्यान, दारूचे व्यसन जडलेल्या लोकांसाठीही येथील इस्पितळात
स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला असून रुग्णाची सोबत करणारा नातेवाईक बरोबर असल्यास या सेवेचा लाभ करून घेता येतो. या विभागात पूर्णवेळ समुपदेशक नेमण्याची आवश्यकता आहे. नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या आयुष मंत्रालयाच्या वतीने येथील इस्पितळाला भेट देणाऱ्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचीही सोय करण्यात आली असून त्यासाठी एक स्वतंत्र विभाग येथे कार्यान्वित असतो परंतु अपुऱ्या माहितीमुळे या विभागाचा रुग्णांना फारसा उपयोग हो नाही, त्यामुळे संबंधित मंत्रालयाच्यावतीने याबाबतीत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे.

सायबर क्राइम एक आव्‍हान; सावधगिरी हाच उपाय

दरम्यान, येथील इस्पितळाला भेट देणाऱ्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर लोकांचा भरणा असतो. त्यामुळे पानाच्या इमारतीच्या काना कोपऱ्यात सर्रासपणे पान खाऊन थुंकल्याचे दिसते. त्यामुळे येथील सोयी सुविधांबरोबरच येथील स्वच्छतेचीही काटेकोरपणे जबाबदारी गरजे आहे.एकंदर नवीन इमारत म्हणजे आरोग्याच्या सोयीसुविधा नसतात तर इमारतीतील आधुनिक यंत्रणा, योग्य साधनसुविधा, तसेच योग्य मनुष्यबळ नियमित स्वरूपात कार्यरत ठेवण्यासाठी संबंधित खात्याकडून वेळोवेळी प्रयत्न होणे आवश्यक आहे

 

संबंधित बातम्या