चर्चिल ब्रदर्सचा धडाक्यासमोर नेरोका निष्प्रभ

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पणजी : माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने रविवारी फातोर्ड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झंझावाती खेळ केला, त्यांच्या धडाक्यासमोर आय-लीग फुटबॉल लढतीत मणिपूरच्या नेरोका एफसी संघ निष्प्रभ ठरला.

पणजी : माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने रविवारी फातोर्ड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झंझावाती खेळ केला, त्यांच्या धडाक्यासमोर आय-लीग फुटबॉल लढतीत मणिपूरच्या नेरोका एफसी संघ निष्प्रभ ठरला.

चर्चिल ब्रदर्सने ४-१ फरकाने सफाईदार विजयाची नोंद करत गुणतक्त्यात सातव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर उडी घेतली. चर्चिल ब्रदर्सला स्पर्धेतील चौथा विजय मिळवून देताना पोनिफ वाझ याने पाचव्या मिनिटास पहिला गोल केला. नंतर २६व्या मिनिटास फिलिप टेटी याने नेरोका एफसीला बरोबरी साधून दिली, मात्र नंतर चर्चिल ब्रदर्सने प्रतिस्पर्ध्यांना अजिबात संधी दिली नाही. त्रिनिदाद-टोबॅगोच्या विलिस प्लाझा याने ३५व्या मिनिटास पेनल्टी फटका अचूक मारला. त्यानंतर उत्तरार्धातील खेळात गोव्याच्या संघाने आणखी दोन गोल केले. विनील पुजारी याने ६५व्या, तर इस्त्राईल गुरुंग याने ९०+१व्या मिनिटास गोल करून यजमान संघाच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.

चर्चिल ब्रदर्सचे आता ८ सामन्यांतून १३ गुण झाले आहेत, तर नेरोका एफसीला सहावा पराभव पत्करावा लागला. त्यांचे ८ गुण आणि आठवा क्रमांक कायम राहिला. त्यांचा हा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला.

गोकुळम केरळाविरुद्धच्या मागील लढतीत प्लाझा तंदुरुस्तीअभावी संघात नव्हता, नेरोकाविरुद्ध आज त्याने पुनरागमन करताना चर्चिल ब्रदर्सचे आक्रमण धारदार केले. त्याने एक गोल नोंदविला, शिवाय उत्तरार्धातील दोन्ही गोल त्याच्या असिस्टवर झाले. नेरोका एफसीच्या आक्रमणांना वारंवार फोल ठरविलेल्या चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक जेम्स किथन सामन्याचा मानकरी ठरला.

सेट-पिसेसवर पोनिफने यजमान संघाचे गोलखाते उघडले. अर्ध्या तासाच्या खेळापूर्वी नेरोकाने चर्चिल ब्रदर्सची आघाडी भेदण्यात यश मिळविले. टेटी याने चर्चिल ब्रदर्सच्या बचावपटूस गुंगारा दिल्यानंतर प्रेक्षणीय फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक जेम्स किथन याचा बचाव भेदला. विश्रांतीला दहा मिनिटे असताना नेरोकाच्या रोशन सिंगने प्लाझा याला अडथळा आणला, त्यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर प्लाझाने अचूक लक्ष्य साधले. तासाभराच्या खेळानंतर चर्चिल ब्रदर्सच्या खाती तिसऱ्या गोलची नोंद झाली. प्लाझाच्या अप्रतिम असिस्टवर पूजारीने चेंडूला नेटची अचूक दिशा दाखविली. इंज्युरी टाईममध्ये प्लाझाच्या पासवर गुरुंगने संघाची आघाडी ४-१ अशी भक्कम केली.

आकड्यांत सामना...
- नेरोका एफसीविरुद्ध चर्चिल ब्रदर्सचे सलग २ विजय, गतमोसमातही होम मैदानावर बाजी
- चर्चिल ब्रदर्सचे स्पर्धेत एकूण १६ गोल, त्यापैकी विलिस प्लाझा याचे ५ गोल
- यंदाच्या होम मैदानावरील ५ लढतीत चर्चिल ब्रदर्सचे ३ विजय, अन्य २ पराभव
 

संबंधित बातम्या