नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील नुने येथील वनखात्याकडूनच वासराला मुठमाती

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

वनखात्याचा प्रकार संशयास्पद अभिजित देसाई :वनमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी

ता. २८ जानेवारी रोजी वासरू इतर गायीगुरांसमवेत घरी परतले नाही म्हणून दुसऱ्या दिवशी शोधाशोध केली असता वासरू वाघाने मारल्याचे दिसून आले.

सांगे: नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील नुने येथील मंगेश कुष्ठा गावकर यांच्या मालकीचे वासरू बिबट्याने फडशा पाडल्याची तक्रार कुर्डी वनकार्यालयात नोंदविली होती. मात्र, वनखात्याने वासराचा फडशा बिबट्याने पाडला नसून कुत्र्याने पाडल्याचे कारण पुढे करून मजुरा करवी वासराला जमिनीत पुरण्याची घटना नुने गावात सात दिवस अगोदर घडल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

त्यावेळी मंगेश गावकर यांनी २९ जानेवारी रोजी वनखात्याच्या कुर्डी वनक्षेत्र कार्यालयात तक्रार नोंदविली असता वनखात्याने नेत्रावळीतील पशुचिकित्सक करवी तपासणी केली असता त्यांना वाघ नसून कुत्र्याने हल्ला केल्याने वासरू मेल्याचा अहवाल सादर केला. वासरावरील हल्ल्यामुळे मंगेश गावकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मात्र असे जर असते तर वन खात्याने त्या वासराला आपल्या खर्चातून मूठ माती का दिली, असा प्रश्न स्थानिक रहिवासी तथा पंचायत सदस्य अभिजित देसाई यांनी केला आहे.या पूर्वी कुत्र्यांनी वासरू किंवा गायीला मारण्याची घटना गावात कधी घडली नाही. मात्र घाई गडबडीत वासराला कुत्र्याने मारले म्हणून मातीत पुरणे हा वनखात्याचा प्रकार संशयास्पद वाटत आहे. अभयारण्य क्षेत्रात शेती भाताची नासाडी केली जात आहे, जनावरांना वाघाकडून मारले जात आहे. मग वनखाते माणसांना मारल्यानंतर जागृत होणार काय, असा प्रश्न अभिजित देसाई यांनी विचारला आहे. तसेच वनमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.

 

संबंधित बातम्या