पोलिसांमध्ये नव्या गाड्यांमुळे वाद

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

‘त्या’ ४४ नव्या वाहनांसाठी ‘रस्सीखेच’

उपअधीक्षक व निरीक्षकांची वरिष्ठांकडे मनधरणी सुरू

पोलिस खात्याच्या ताफ्यात दाखल झालेली नवीन वाहने.

पोलिस नियंत्रण कक्षाची वाहने रस्त्यावर गस्त घालून फार जुनी झाली आहे. या वाहनांनी क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात किलोमीटर अंतर पूर्ण केले तरी त्याच स्थितीत पोलिसांना रात्रीच्यावेळी गस्त घालताना चालवाव्या लागत होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लोकांना जलद व चांगली सेवा देण्यासाठी या गाड्या बदलून नव्या वाहनांचे उद्‍घाटन केले होते.

पणजी : गोवा पोलिस खात्याच्या ताफ्यात दाखल झालेल्या ४४ नवीन वाहने पोलिस नियंत्रण कक्ष व राष्ट्रीय महामार्गावरील गस्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी देऊन एक दिवस उलटण्याआधीच त्या वाहनांवरून वाद सुरू झाला आहे. खात्याच्या काही उपअधीक्षक व निरीक्षकांनी या नव्या उच्च सुविधा असलेल्या वाहनांवर डोळा ठेवून वरिष्ष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा आज पोलिस वर्तुळात सुरू होती.

ही वाहने पाहून काल उद्‍घाटनाच्या दिवशीच त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांच्या बदल्यात या नव्या गाड्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वशिला लावण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे पोलिस नियंत्रण कक्षासाठी आणलेली ही वाहने आता काही उपअधीक्षक व निरीक्षकांना देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही उपअधीक्षकांनी त्यांच्याकडे असलेल्या वाहनांच्या बदल्यात नवी वाहनामधील गाडी मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या काही अधिकाऱ्यांना दिलेल्या गाड्याही जुन्या झाल्या आहेत. मात्र त्यांना या गाड्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीच त्या वापरल्या जातात त्यामुळे रात्रंदिवस रस्त्यावर गस्तीवर असणाऱ्या वाहनांपेक्षा त्यांना अधिक गरजेच्या असू शकत नाहीत. त्यामुळे या नव्या वाहनांमधील काही वाहने या उपअधीक्षक किंवा निरीक्षकांना द्याव्यात हा निर्णय वरिष्ठांचा असेल अशी माहिती पोलिस सूत्राने दिली.

पोलिस नियंत्रण कक्षाकडे असलेल्या गस्तीवरील वाहने ही रस्त्यावर चालविण्यास तंदुरुस्त नाहीत. महामार्ग वगळता अंतर्गत रस्त्यांवर ही वाहने चालविण्याच्या लायकीची नाहीत. वारंवार त्या नादुरुस्त पडतात. या वाहनांची दुरुस्ती करून त्याचा परत वापर केला जात असल्याने या वाहनांवरील चालकही त्या चालविण्यास कंटाळलेले आहेत. पोलिस खात्यात येणाऱ्या नवी वाहने ही नेहमीच वरिष्ठ पोलिस अधिकारी आपल्यासाठी घेऊन त्यांनी वापरलेली वाहने ही हाताखालील अधिकाऱ्यांना दिली जातात. वरिष्ठ अधिकारीपदावर आयपीएस अधिकारी असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांचे त्यांच्यापुढे काहीच चालत नाही. अनेकवेळा वाहनासाठी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

गोव्याचे महासंचालक सतीश गोलचा?
या वाहनांसंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क साधण्यात आला मात्र त्यात यश आले नाही. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून या खात्याला पोलिस महासंचालक नाही. गेल्या नोव्हेंबरमध्ये गोव्याचे माजी महासंचालक प्रणब नंदा यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर अजूनही गोव्याला महासंचालक केंद्रातून पाठवण्यात आलेला नाही. गोव्यात यापूर्वी सेवा केलेले व उत्तर दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांची वर्णी गोव्यात लागण्याची शक्यता आहे. पोलिस महासंचालकपदाचा ताबा असलेले महानिरीक्षक जसपाल सिंग हे गोव्याबाहेर त्यामुळे खात्याचे प्रमुख म्हणून पोलिस उपमहानिरीक्षक हे भूमिका बजावत आहेत

संबंधित बातम्या