नवे वर्ष... युवकांच्‍या नवीन संकल्‍पना

Dainik Gomantak
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

प्राची नाईक, 

प्राची नाईक, 

पणजी

अगदी काल, परवाच २०१९ सुरू झाले आणि २०२० दारात पोहोचले असेच वाटते. गेल्या वर्षी खूप काही घडले, आम्हाला खूप काही गवसले तसेच खूप काही गमावले देखील. प्रत्येक वर्षी असेच असते. प्रत्येक वर्ष आपल्या आयुष्यात नवीन लोक, नवनवीन अनुभव आणि वेगवेगळी वळणे घेवून येते. प्रत्येक वर्षी आपण काही नवीन करायचे ठरवतो, नवीन स्वप्ने बघतो, काही सत्यात उतरतात तर काही अशीच तिथल्या तिथे नाहिशी होतात.

आपल्या आयुष्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, काय हवे आहे हे प्रत्येकाचे ठरलेले असतेच असे नाही. काही दहावीनंतरच त्यांना आयुष्यात काय करायचे आहे यावर ठाम असतात तर काहीजणांना हे समजण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. काहीजणांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले की लगेच नोकरी मिळते तर काही जणांना कित्येक वर्षे वाट पाहावी लागते. प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ असते आणि प्रत्येकाला ती वेळ आली की त्याला ते ते मिळते हेच सत्य आहे. त्यामुळे ज्यांना अजून त्यांचे क्षितिज गवसलेले नाही त्यांनी हताश न होता आयुष्याचे प्रत्येक वळण आपल्याला नवीन संधी देणार आहे हे ठरवून घालवावे. हे येणारे नवीन वर्ष नवीन संधी आणि नवीन अनुभव घेवून येणार हे नक्की.
बहुतेक लोक नवीन वर्षासाठी नवीन संकल्प करतात. पण किती जण त्या संकल्पांवर वर्षभर टिकून राहणार याची खात्री काहीच नसते. मला आयुष्यात हे मिळवायचे आहे, मला इथे जायचे आहे, नवीन वर्षात नवीन लोकांना भेटायचे आहे हे आम्ही सर्वसामान्य मनात ठरवतोच. नवीन वर्षासाठीच्या संकल्पाच्या यादीमध्ये दरवर्षी नवीन गोष्टीची भर पडत असते. पण आजच्या काळातील मुले या यादीत फक्त भौतिक आनंद देणाऱ्या गोष्टीच नव्हे तर मानसिक आनंद देणाऱ्या गोष्टी करण्यात जास्त भर देत असल्याचे जाणवते. भौतिक गोष्टीच्या मागे पळून मिळणारे सुख किती दिवस टिकते? पण जर आपल्या मानसिक आनंदाच्या दिशेने काम केले तर सगळी सुखे आपल्या पायाकडे लोळण घालतील असे या नवीन पिढीचे मानणे आहे. त्यामुळे आता एक नवीन प्रवाह येत आहे हे नक्की.

शार्लिन मिनेझिस, विद्यार्थिनी -
मी दरवर्षी भौतिक सुखाचीच अपेक्षा केली पण कालांतराने त्यात काहीच सुख मिळत नाही हे मला समजले. आम्ही आमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यात एवढे मग्न असतो की त्यापुढे आम्ही कधीकधी आपल्या मानसिक आरोग्याचा आणि शांतीचा त्याग करतो. मला असे वाटते की करियर, परीक्षा, नोकरी इत्यादीबद्दल खूप ताणतणाव घेवून काय उपयोग आहे जेव्हा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि म्हणूनच आम्हाला अनेक आत्महत्याच्या घटना घडताना दिसतात. म्हणून येणाऱ्या नवीन वर्षासाठी माझे ध्येयच मुळी आनंद प्राप्त करणे आहे आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मानसिकदृष्ट्या आनंदी राहणे. असे काम करणे ज्यातून मला आनंद मिळेल. कारण जोपर्यंत माझे मानसिक आरोग्य चांगले आहे, माझा विश्वास आहे की मी परीक्षेत किंवा माझ्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर काहीही मिळवू शकेन.

हरीश ताम्हणकर, विद्यार्थी-
गेल्या वर्षातील माझ्या आयुष्यातील घडामोडी पाहता पाहता आयुष्यात असे क्षण येवून गेले ज्यांच्या आठवणीने मन अगदी आनंदित केले तर काही फार दुखी करून गेले, काही प्रसंगांनी मला अगदीच दुर्बल बनवले तर काही नवीन बळ देवून गेले. आयुष्यात चढउतार असतात, त्यामुळे प्रत्येक अनुभवातून नवीन काहीतरी शिकणे झाले. त्यामुळे या नवीन वर्षास मी एक नवीन टप्पा, जगण्याची एक नवीन संधी म्हणून पाहू इच्छितो आणि प्रत्येक क्षण आनंदाने आणि माझ्या आजूबाजूला लोकांना सुखात ठेवून घालवायचे आहे. आयुष्यातील कुठलेही वळण असेना ते आनंदाने जगायचे. कारण काळोख्या रात्रीमागे एक प्रकाशमान दिवस असतोच ना.

ननिषा बरेटो, विद्यार्थिनी
सरत्या वर्षात मी केलेल्या चुकांची येत्या वर्षात पुनरावृत्ती होवू नये याकडे माझे लक्ष असणार आहे. सगळ्यात महत्त्‍वाचे म्हणजे माझ्या स्वप्नांच्‍या दिशेने अधिक चांगले काम करून, इच्छित नोकरी शोधण्यास मी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. त्यासोबत जंक फूड सोडून माझ्या आहारात अधिक पोषक अन्नाचा समावेश करण्याचे मी ठरवले आहे. माणसाच्या मनात असलेली नकारात्‍मताच कधी कधी जगणे कठीण करून टाकते त्यामुळे मी यावर्षी अधिक सकारात्मक बनण्याचा प्रयत्न करण्याचा मानस घेतला आहे. त्यासोबतच थोड्या अधिक जबाबदारीने वागणेही मी या संकल्‍पनांच्या यादीत समाविष्ट केलेले आहे.

प्रथम नाईक, विद्यार्थी -
गेल्या संपूर्ण वर्षात खूप काही नवीन शिकायला मिळाले, नवीन माणसे भेटली, नवीन अनुभव घेतले. गेल्या संपूर्ण वर्षाचा आढावा घेता पदरात भरपूर यश आले पण त्यासोबत काही जवळची माणसेही गमावली, त्याचे दुःख मनाला आयुष्यभर त्रास देईलच. या येणाऱ्या वर्षात माझे करिअर घडवण्यासाठी आणखी जोमाने काम करायचे आहेच, पण त्यासोबत माझ्याने जमेल तेवढे स्वकियांना जवळ ठेवायचे आहे.

रती फातर्पेकर, विद्यार्थिनी -
शिक्षणामुळे घरकाम करणे, स्वयंपाक बनवणे जास्त शक्य व्हायचे नाही. त्यामुळे मला स्वयंपाकातले काहीच कळत नाही. यावर्षी मी आईला घरकामात विशेषतः स्वयंपाकात मदत करण्याचे ठरवले आहे. मला स्वयंपाक शिकायचाच आहे आणि त्यामुळे आईसोबत जास्त वेळ घालायला मिळेल. जास्त काही मोठे पदार्थ मला एवढ्यातच जमेल असे वाटत नाही, त्यामुळे सध्यातरी साध्या पदार्थांपासून सुरवात करणार आहे.

शालींदा मोंतेरो, विद्यार्थिनी
प्रत्येकाच्या काही ना काही तरी नवीन वर्षाच्या संकल्पना असतातच. सरत्या वर्षाकडे पाहता मला यावर्षी जरा सक्रियपणे काम करावेसे वाटते. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्‍वाचा संकल्प म्हणजे जिमला जाणे आणि योग्य आहार घेणे. मी एरव्ही गरज नसताना उगाच पैसे खर्च करते त्यामुळे यावर्षी माझ्याने जमेले तेवढे खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मी प्रयत्न करीन.

संबंधित बातम्या