अडीचशे रुपयांना एक निरफणस!

Dainik Gomantak
शनिवार, 25 एप्रिल 2020

निरफणसापासून तळलेली कापे, कटलेट्‌स आदी खाद्यपदार्थ बनवतात. काहीजण भाजीही बनवतात. निरफणसापासून बनवण्यात येणारे पदार्थ चवदार लागत असल्याने ग्राहक निरफणसाला अधिक पसंती देतात.

डिचोली, 

आहारातील एक घटक आणि अत्यंत रुचकर असलेल्या निरफणसांचे सध्या दिवस असून डिचोली बाजारात आता निरफणसांची आवक होऊ लागली आहे. यंदा मात्र टाळेबंदीमुळे निरफणसांना चांगले दिवस आले असून त्याचा भावही वाढला आहे. निरफणसाला असलेली मागणी आणि टाळेबंदी याचा फायदा उठवत विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा दराने निरफणसाची विक्री सुरू केली आहे.
निरफणसाचे दर ऐकून सामान्य ग्राहकांच्या कपाळावर आट्या पडल्यावाचून राहणार नाहीत. सध्या मोठ्या आकारचे निरफणस चक्‍क २५० रु. नग याप्रमाणे विकण्यात येत आहेत. निरफणसापासून तळलेली कापे, कटलेट्‌स आदी खाद्यपदार्थ बनवतात. काहीजण भाजीही बनवतात. निरफणसापासून बनवण्यात येणारे पदार्थ चवदार लागत असल्याने ग्राहक निरफणसाला अधिक पसंती देतात. त्यातच टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सध्या स्थानिक गावठी भाज्यांचे प्रमाण कमी झाल्याने निरफणसांना तेजी आली आहे. विक्रेतेही याच संधीचा फायदा उठवत आहेत. डिचोलीत बहुतेक भागात निरफणसाची झाडे दृष्टीस पडतात. कुळागरी भागात निरफणसांच्या झाडांचे प्रमाण अधिक आहे.

अळंब्यांना मोठी मागणी
अन्य भाजीपाल्यासह उत्पादीत करण्यात येणाऱ्या अळंब्यांनाही सध्या बाजारात ग्राहकांकडून मागणी आहे. एरव्ही ३५ ते ४० रुपयांना मिळणाऱ्या अळंब्यांच्या एका पाकीटामागे आता ५० रुपये आकारण्यात येत आहेत. अळंब्यांना मागणी असल्याने त्यातच टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर बाजारात ग्राहकांची वर्दळ होत आहे. त्यामुळे डिचोली बाजारात तर काहीजणांनी दुचाकीच्या माध्यमातून अळंबी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

 

संबंधित बातम्या