नितीशकुमारांचा 'आतला' आवाज अन्‌ 'बाहेर'चे प्रतिसाद...

Jyoti Nalawde
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत अस

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचा पट बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी सुरू झाली अन्‌ बिहारचे राजकारण ढवळून निघाले. लालूंचे पुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तेजस्वी यांच्या राजीनाम्यासाठी मोहीमच उघडली. स्वच्छ प्रतिमेच्या नितीशकुमारांवरील नैतिक दबाव वाढू लागला. संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलातील संबंध ताणले गेले. एकीकडे बिहारमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना तिकडे दिल्लीत संसद अधिवेशन सुरू झाले अन्‌ राष्ट्रपतिपदाची निवडणूकही झाली. बिहारचे राज्यपालपद भूषवलेले रामनाथ कोविंद राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. मंगळवारी त्यांचा शपथविधी होऊन ते देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. देशाच्या इतिहासातील या महत्वाच्या क्षणाला चोवीस तास उलटत नाहीत, तोवर बुधवारी सायंकाळी नितीशकुमारांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला आणि दिल्लीकडे सरकलेला मीडिया, सोशल मीडियाचा लंबक एकाएकी पाटण्यावर येऊन स्थिरावला... 

नितीशकुमार हे स्वच्छ प्रतिमेचा, संवेदनशील नेता म्हणून ओळखले जातात. पण, ते तितकेच मुत्सद्दी, मुरब्बी नि दूरदर्शी राजकारणीही आहेत. आपल्या कारकिर्दीवर भ्रष्टाचाराचा डाग लागणार नाही, याची त्यांनी कसोशीने खबरदारी घेतली. त्याचवेळी आपली लोकप्रियता आणि त्यातून तयार होणारा राजकीय आलेख खाली येणार नाही, याचीही पुरेपूर दक्षता घेतली. वैचारिक भूमिका जुळत नसतानाही "समविचारी पक्ष' म्हणून त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी हातमिळवणी करीत सत्ता हस्तगत केली. सर्वाधिक जागा मिळूनही नितीशकुमारांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्याशिवाय लालूप्रसादांपुढे "पर्याय' नव्हता. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वखालील भाजपला रोखण्यासाठीच्या राजकीय अपरिहार्यतेतून हे "गठबंधन' तयार झाले. वास्तविक बिहारच्या मतदारांनीच मर्यादित जागांवर भाजपचा वारु रोखला होता. पण, नितीशकुमारांना भाजपने बाहेरुन पाठिंबा दिला, तर जास्त जागा मिळवूनही आपण सत्तेपासून दूर राहू, या धास्तीतून लालूंनी नितीश यांच्या मुख्यमंत्रिपदाला सहमती दर्शवली. हे करताना पुत्र तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री केले. मात्र तरीही नितीशकुमारांमुळे सत्तेवर आपला थेट अंकुश राहणार नाही, याची लालूंना जाणीव होती. किंबहुना, सरकारमध्ये कुणीही ढवळाढवळ करणार नाही, या अटीवरच नितीश यांनी राजद आणि काँग्रेसचा पाठिंबा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. राज्य सरकारमधील सत्तेची "फळे' चाखत लालूंनी गेल्या वर्षभरापासून "गठबंधना'त आणखी काही समविचारी पक्षांना आणत भाजपविरोधी "महागठबंधना'ची मोट बांधायला सुरवात केली होती. ही आघाडी स्वतःच्या खेळात किती यशस्वी होते, यापेक्षा ती आपला खेळ बिघडवू शशकते, हे भाजपने हेरले. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांच्यासह लालूंच्या आख्ख्या परिवाराची "सीबीआय'ने भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली चौकशी सुरू केली अन्‌ "दिल्ली'कडून येणाऱ्या "हवे'वर पाटण्यातील "वातावरण' बदलू लागले... 

नितीशकुमारांचा राजीनामा हा केवळ बिहारच्याच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातील भूकंप मानला जात असला, तरी त्याचा केंद्रबिंदू नेमका कुठे होता, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण, नितीश यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी झालेल्या पक्षातील आमदारांच्या बैठकीतून अथवा तेजस्वी यांच्या राजीनाम्याची मागणी ठामपणे फेटाळण्याच्या लालूप्रसादांच्या कृतीतून हा भूकंप आला, असे वरकरणी वाटू शकते. प्रत्यक्षात त्यातील अंतःप्रवाह राष्ट्रीय राजकारणाच्या ध्रुवीकरणाकडे जाताना दिसत आहेत. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांची प्रशंसा आणि समर्थनाचे केलेले ट्‌विट ही याच प्रवाहातील एक लाट असू शकते. बिहारमध्ये भाजपने मध्यावधी निवडणुकांना विरोध करीत नितीशकुमारांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी देऊ केलेला पाठिंबा, हेही या प्रवाहाला 'अनुकूल' दिशेने वळवणारे वळण ठरेल. आणि यापेक्षाही काही अतार्किक नि अनपेक्षित शक्यता येणाऱ्या काळात वास्तविकतेत परावर्तित झाल्यास नवल वाटायला नको! नितीशकुमारांच्या राजीनाम्याने आणि पुन्हा मुख्यमंत्रिपदी येण्याने एक नवा प्रवाह देशाच्या राजकारणात वाहू लागेल... कदाचित गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाहत असलेल्या मुख्य प्रवाहाची दिशाही तो बदलेल... 

मुख्यमंत्रिपदाचा त्याग करताना नितीशकुमार यांनी, सध्याच्या स्थितीत काम करणे अवघड झाल्याने 'आतला' आवाज ऐकून हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. आज कितीही कान देऊन ऐकला तरी त्यांच्या या विधानातील 'आवाजा'चा पुरता अंदाज येणार नाही. कारण नितीशकुमार संवेदनशील माणूस आहेत, तितकेच धोरणी नेताही आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रसंगी आपण सत्ताही लाथाडू शकतो, हे बेधडक राजीनाम्यातून दाखवून देत आपली प्रतिमा उजळवण्यात ते यशस्वी झाले आहेतच; पण त्यापेक्षाही वैचारिकदृष्ट्या एक होऊ न शकणाऱ्या आणि एक झालेच तर कितपत यशस्वी होतील, याची खात्री नसलेल्या पक्षांच्या 'महागठबंधना'चे जोखडही त्यांनी अलगदपणे खांद्यावरुन खाली उतरवले आहे. विचारांशी फारकत न घेता आपले राजकारण पुढे जाईल, असे ते सांगू शकतात. पण, अलीकडच्या काळातील त्यांची भाजप आणि विशेषतः पंतप्रधान मोदी यांच्याविषयी बदललेली भूमिका या संदर्भात पुरेशी बोलकी आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात शक्ती घालवण्यापेक्षा त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न राजकारणात अनेक जण करतात. काहींना लाटांवरुन उंची गाठता येते, काही पैलतीराला लागतात, तर काही तळाला जातात... देशात आजच्या घडीला नितीशकुमार हे एकमेव असे नेते आहेत, जे या लाटेवर स्वार होऊन उंची तर गाठतीलच, पण तिचा प्रवाहही आपल्या सोयीने वळवतील! त्यांच्या 'आतल्या' आवाजाला 'बाहेरुन' मिळणारे 'प्रतिसाद' अन्‌ त्यातून उमटणारे नवे 'पडसाद' याच बदलत्या प्रवाहाच्या खुणा असाव्या

संबंधित बातम्या