गोवा स्वातंत्र्य झाल्यापासून पेडणे शहराचा आवश्‍यकतेनुसार विकास झालेला दिसत नाही 

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

धारगळ:पेडण्याचा विकास अद्याप रखडलेलाच!
सुशिक्षित युवक - युवतींना भेडसावतोय बेरोजगारीचा प्रश्न

धारगळ:पेडण्याचा विकास अद्याप रखडलेलाच!
सुशिक्षित युवक - युवतींना भेडसावतोय बेरोजगारीचा प्रश्न
गोवा मुक्त झाल्यापासून पेडणे शहराचा आवश्‍यकतेनुसार विकास झालेला दिसत नाही.तालुक्‍याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेडणे शहरात तालुक्‍याशी निगडीत सर्व सरकारी कार्यालयांचा समावेश पेडण्यात आहे. पेडणे तालुक्‍यातील जनतेच्या सोयीसाठीही सरकारी कार्यालये ज्या पद्धतीने पाहिजे होती तशी ती आज दिसत नाही.उदाहरण द्यायचे झाले, तर इब्रामपूर हणखणेहून पेडण्याला यायचे झाले, तर दोन वेळा बससेवा बदलून पेडण्यात यावे लागते, अशी स्थिती मांद्रे गावची आहे.मागील अनेक वर्षे बससेवा सुरळीत नसल्याने सरकारी कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत आहे.

पेडण्यातील वाढती बेरोजगारी
सध्या पेडण्यात अनेक युवक यवुतींसह सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.ही वाढती बेरोजगारी दूर करण्यासाठी पेडण्यात सुसज्ज अशी औद्योगिक वसाहत उपलब्ध नाही.तुयेतील औद्योगिक वसाहत पूर्णतः मोडकळीस आली आहे.मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ, धारगळमध्ये होणारी तथाकथिक क्रीडानगरी, वादाच्या भोवऱ्यात सापडलेला तुयेतील इलेक्ट्रॉनिक सिटी या सर्व प्रलंबित प्रकल्पावर कधी पडदा पडेल हे सांगता येत नाही.त्यामुळे पेडण्यातील सुशिक्षित बेरोजगारांना अन्य तालुक्‍यावर किंबहूना बाहेरील राज्यांवर अवलंबून रहावे लागत आहे.गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पेडण्याची बेरोजगारी कमी करण्यासाठी तुये भागात इलेक्ट्रॉनिक सिटी उभारण्याचे काम हाती घेतले.याद्वारे पेडणे तालुक्‍यातील जवळपास अर्ध्याहून अधिक बेरोजगारी नष्ट होणार असे वाटत होते.तुये औद्योगिक वसाहतीला लागून नवीन १०० खाटांचे हॉस्पिटल नव्यानेच बांधण्यात आले आहे.माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांची ही संकल्पना. मात्र, या हॉस्पिटलचेसुद्धा गेल्या दोन वर्षात ज्या पद्धतीने काम पूर्ण व्हायला हवे होते ते झालेले दिसत नाही. आज अनेक युवक नोकरीसाठी आमदार मंत्र्यांच्या दारी हेलपाटे मारत आहेत. त्यांना केवळ आश्‍वासनाशिवाय दुसरे काही मिळत नाही.तुये येथील औद्योगिक वसाहतीत नवनवीन औद्योगिक कंपन्या आणल्या असत्या, तर बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविणे शक्य होते.
धारगळ दोन खांब या ठिकाणी दोन ते तीन लहान लहान कंपन्या आहेत.मात्र, त्या ठिकाणी पेडण्यातील युवक जाऊ शकत नाहीत अशी स्थिती त्या कंपनींची आहे.म्हणूनच आज पेडण्यातील युवक युवती सकाळी उठल्या उठल्या म्हापसा, करासवाडा, थिवी, पर्वरी, पणजी, वेर्णा, कुंडई अशा औद्योगिक वसाहतींकडे धाव घेत असताना दिसत आहेत.

बेरोजगारीचा प्रश्‍न पेडण्यात मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तुये पठारावर असलेली आणि धारगळ येथे असलेली दोन्ही औद्योगिक वसाहती सुधारण्याची गरज आहे.त्यासाठी लागणारे जोड रस्ते, पाण्याची व्यवस्था आणि विजेची व्यवस्था पेडण्यातील दोन्ही आमदारांनी प्रामुख्याने केली, तर हा प्रश्‍न सुटू शकतो.

आसगाव येथे रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती
पेडणे तालुक्‍यामध्ये असलेली पर्यटन इंडस्ट्री टिकविणे आवश्यक असून तेथील भेडसावणारे पार्कींग, चेंजींग रूम, पाण्याची व्यवस्था या समस्या प्रामुख्याने सोडविल्या तर पेडण्यातील अनेक युवक बेरोजगारीपासून मुक्त होण्यास वेळ लागणार नाही. केवळ आमदारांनी गटारे, संरक्षण भिंत, पदपथ न उभारता भविष्यात उपयोगी पडणारे दूरगामी प्रकल्प आणून पेडणे तालुक्‍याचा विकास साधणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या