पैरा येथील चौगुले खाणीवर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन नाही

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

चौगुले खाणीवरील जवळपास ५० हजार टन खनिज सेझा (वेदांता) कंपनीने ई-लिलावाव्दारे विकत घेतले आहे. चौगुले खाणीवरुन सेझाकडून (वेदांता) फक्ता खनिजाची वाहतूक करण्यात येत आहे.अन्य कोणत्याही बेकायदा कारवाया चालू नाहीत.असेही मामलेदार श्री. पंडित यांनी पाहणीनंतर आपल्या अहवालात म्हटले आहे.

डिचोली: पैरा-शिरगाव येथील चौगुले खाणीवर खनिज उत्खनन वा अन्य कोणत्याही बेकायदेशीर कारवाया चालू नसल्याचा निष्कर्ष डिचोलीचे मामलेदार यांनी काढला असून, तसे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. 

ई-लिलावाच्या खनिज वाहतुकीच्या नावाखाली पैरातील चौगुले खाणीवर बेकायदा खनिज उत्खनन चालू आहे. असा खळबळजनक आरोप शिरगाववासियांनी काल (सोमवारी) डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीवेळी केला होता.या आरोपाची उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी गंभीर दखल घेताना, खाण परिसराची पाहणी करण्याचे निर्देश मामलेदार प्रवीणजय पंडित यांना दिले होते.त्यानुसार आज सायंकाळी खाण आणि भूगर्भ खात्याची भुगर्भतज्ञ कार्व्हालो यांच्यासह मामलेदार श्री. पंडित यांनी पैरा येथे जाऊन चौगुले खाण परिसराची पाहणी केली.यावेळी सेझा (वेदांता) कंपनीचे खाण व्यवस्थापक संतोष मांद्रेकर, श्री. कामिलो, चौगुले कंपनीचे व्यवस्थापक श्री. साबळे तसेच शिरगावचे सरपंच सदानंद गावकर आणि अजय गावकर उपस्थित होते.

शिरगावमधील घरगुती नळांची पाण्याची बिले संबंधित खाण कंपन्यांनी भरली नसल्याने शिरगावचे नागरिक आक्रमक बनले आहेत.शिरगाववासियांनी रस्त्यावर उतरताना गेल्या शनिवारपासून चौगुले खाणीवरील सेझाची (वेदांता) खनिज वाहतूक रोखून धरली आहे.या प्रश्नाूवर तोडगा काढण्यासाठी काल (सोमवारी) डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी चौगुले खाणीवर बेकायदा खनिज उत्खनन आणि झाडांची कत्तल केल्याचा आरोप शिरगावचे सरपंच सदानंद गावकर यांच्यासह नागरिकांनी केला होता.खाण परिसरातील झाडे तोडायची आवश्यगकता भासल्यास संबंधित यंत्रणेकडून तसा परवाना घ्यावा.असेही मामलेदार श्री. पंडित यांनी खाण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.दरम्यान, मामलेदारांच्या अहवालानुसार चौगुले खाणीवर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने, आता शिरगाववासियांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
 

 

सांगेत सरकारी कार्यालयांना उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट

संबंधित बातम्या