मये तलावावर शुकशुकाट

Dainik Gomantak
रविवार, 3 मे 2020

सध्या या तलावाला 'टाळेबंदी' चा फटका बसला आहे. जागतिक पर्यटन नकाशावर झळकलेल्या डिचोली शहरापासून जवळच असलेला हा तलाव सध्या पर्यटनासाठी बंद असल्याने सध्या तलाव ठिकाणी सामसूम पसरल्याचे जाणवत आहे. 'बंजी जंम्पिंग' हा प्रकल्पही सध्या बंद असल्याने साहसी पर्यटनाचा थरारही सध्या अनुभवता येत नाही.

डिचोली

टाळेबंदी' मुळे राज्यातील पर्यटन व्यवसायावर सध्या विपरीत परिणाम झाला असून, पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व व्यवहार आणि प्रकल्प सध्या बंद आहेत. 'बंजी जम्पिंग' प्रकल्पासह पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या साधनसुविधा उभारुन चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मये तलावाच्या विकसीत कामाचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. आठ महिन्यापुर्वी हा तलाव पर्यटनासाठी खुला करण्यात आला होता. मये तलावाचा विकास करण्यात आल्याने या तलावाला गतवैभव प्राप्त होण्याच्या आशा नुकत्याच कुठेतरी पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, सध्या या तलावाला 'टाळेबंदी' चा फटका बसला आहे. जागतिक पर्यटन नकाशावर झळकलेल्या डिचोली शहरापासून जवळच असलेला हा तलाव सध्या पर्यटनासाठी बंद असल्याने सध्या तलाव ठिकाणी सामसूम पसरल्याचे जाणवत आहे. 'बंजी जंम्पिंग' हा प्रकल्पही सध्या बंद असल्याने साहसी पर्यटनाचा थरारही सध्या अनुभवता येत नाही. आधीच तलावाच्या विकसीत कामानिमित्त सलग चार वर्षे हा तलाव पर्यटनासाठी बंद होता. त्यातच आता 'टाळेबंदी' मुळे यंदाचाही पर्यटन मोसम वाया गेल्यातच जमा आहे.
'पर्यटन'ला ग्रहण..!
मार्च 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते मये तलावाच्या विकसीत कामाची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाचे काम रेंगाळत गेले. त्यामुळे पर्यटनासाठी तब्बल चार पर्यटन मोसम हा तलाव बंद होता. मध्यंतरी वर्षांपुर्वी या तलाव प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्याचा बेत आखला होता. मात्र अगोदर प्रकल्पात रोजगार आणि गाळे द्या. नंतरच उद्‌घाटन करा. अशी भुमिका स्थानिकांनी घेतल्याने त्यावेळी उद्‌घाटनाचा बेत फसला होता. अखेर चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या 27 तारखेला या प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. मध्यंतरी स्थानिकांना गाळे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रकल्पस्थळी विस्तारीत बांधकामही करण्यात आले आहे. प्रकल्पाचे उद्‌घाटन केल्यानंतर पावसाळा संपल्यानंतर या तलावाला गतवैभव प्राप्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. हळूहळू पर्यटकही या तलावाकडे आकर्षित होत होते. मात्र 'कोविड' महामारीचा नायनाट करण्यासाठी टाळेबंदी अंमलात आली आणि अन्य पर्यटन स्थळांसह मये तलावावरही त्याचा परिणाम झाला आहे. सध्या हा तलाव पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. तलावावर सुसज्ज साधनसुविधा उभारण्यासाठी 2015 पासून चार पर्यटन मोसमासाठी हा तलाव पर्यटनासाठी बंद होता. आता सलग पाचव्या वर्षी या तलावावरील पर्यटन मोसमाला 'टाळेबंदी' चे ग्रहण लागले आहे.
'बंजी जंम्पिंग'चा थरार बंद !
ुपर्यटकांना भुरळ घालणारे आणि पर्यटनाचे आकर्षण असलेल्या 'बंजी जंम्पिंग' ही साहसी पर्यटन सेवा मये तलावावर उभारण्यात आली आहे. देशातील दुसरा आणि गोव्यातील हा पहिलाच साहसी पर्यटन प्रकल्प आहे. बंजी पॅडवरुन 55 मीटर उंचीवरुन पाण्यात उडी घेण्याचा साहसी थरार पर्यटकांना अनुभवता येत आहे. न्यूझीलंडमधील खास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सेवा पर्यटकांसाठी निश्‍चितच आकर्षित करीत असून, टाळेबंदी अंमलात येण्यापुर्वी या साहसी पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक तलावावर येत असे. त्यामुळे यंदाच्या मोसमात पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मये तलावाच्या विकसीत प्रकल्पाच उद्‌घाटन करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून पर्यटकांसाठी ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. या साहसी पर्यटनाचा थरार अनुभवण्यासाठी यंदाच्या पर्यटन मोसमात पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणार. असा पर्यटन खात्यालाही विश्वास होता. मात्र, टाळेबंदी मुळे या विश्वासाला सध्या तरी तडा गेला आहे.
 

 

संबंधित बातम्या