साळ, वाठादेव बंधारे पडले ओस

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

साळ येथील शापोरा नदीवरील बंधाऱ्यासह तालुक्‍यातील वाठादेव, व्हावटी आदी काही भागातील बंधारेही स्थानिक तसेच गावाबाहेरील तरुणाईला आकर्षित करीत असतात.

डिचोली

'टाळेबंदी'चा यंदा नैसर्गिक जलस्त्रोतांवरील गजबजाटावरही परिणाम झाला असून, उन्हाळ्यात आंघोळीसाठी प्रसिध्द असलेले डिचोलीतील विविध भागातील बंधारे पर्यटकांअभावी सध्या ओस पडल्याचे दिसून येत आहे. उष्णतेचा पारा चढून उकाडा असह्य होवू लागला, की प्रत्येकाला शीतल पाण्याच्या गारवा हवाहवासा वाटतो. अशावेळी गावागावातील नदी, तलाव, बंधारे आदी जलस्त्रोते प्रत्येकाला खुणावू लागतात.आणि मग प्रत्येकाची पावले जलस्त्रोतांच्या दिशेने वळू लागतात. तापमानातील बदलावेळी गावोगावी तलाव, बंधारे गजबजू लागतात. सध्या उकाड्याचे दिवस असूनसुध्दा यंदा बंधाऱ्यांवर गजबजाट दिसून येत नाही. 'टाळेबंदी' मुळे बंधाऱ्यावर सहजासहजी कोणी जात नसल्याने डिचोलीतील विविध भागातील बंधारे सध्या ओस पडले असून, बंधाऱ्यांवर सामसूम दिसून येत आहे. तालुक्‍यातील प्रसिध्द आणि पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेला साळ येथील शापोरा नदीवरील बंधाऱ्यासह तालुक्‍यातील वाठादेव, व्हावटी आदी काही भागातील बंधारेही स्थानिक तसेच गावाबाहेरील तरुणाईला आकर्षित करीत असतात. वाठादेवसह साळ आदी काही बंधारे आंघोळीसाठी असुरक्षीत असले, तरी उकाडा असह्य झाला, की दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात वाठादेव, साळसह विविध भागातील बंधारे गजबजू लागतात. मात्र, यंदा बंधाऱ्यांवर हा गजबजाट दिसून येत नाही. 'कोरोना' (कोविड-19) महामारीचा नायनाट करण्यासाठी सध्या टाळेबंदी लागू आहे. आंघोळीची मजा लुटण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्यास गर्दी होण्याची शक्‍यता गृहीत धरुन बहूतेकजण बंधाऱ्यावर जाणे टाळतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे बंधाऱ्यांवर गजबजाट सोडाच, उलट एकदम सामसूम दिसून येत आहे.
साळ बंधाराही निर्मनुष्य !
साळ येथील शापोरा नदीवरील बंधारा गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी पर्यटनाच्यादृष्टीने बराच प्रकाशझोतात आला आहे. हा बंधारा स्थानिक तसेच राज्याबाहेरील पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात हा बंधारा पर्यटकांना खुणावत असतो. उन्हाळ्यात तर या बंधाऱ्यावर सदैव गजबजाट दिसून येत असतो. बेशिस्तपणा, हुल्लडबाजी आदी गैरप्रकार रोखण्यासाठी या बंधाऱ्यावर पर्यटन सहलीवर बंदी घालण्यात आल्याने या बंधाऱ्यावरील गैरप्रकारांवर काहीसे नियंत्रण सोडल्यास बंधाऱ्यावर पर्यटकांची ये-जा चालूच असते. रविवारी आणि अन्य सुटीच्या दिवसात या बंधाऱ्यावर आंघोळीची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळून बंधारा हाऊसफूल्ल असतो. यंदा मात्र टाळेबंदी मुळे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी या बंधाऱ्यावर सहजासहजी कोणी जात नाही. त्यामुळे उत्तर गोव्यातील हा प्रसिध्द बंधारा आता निर्मनुष्य बनल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या