कवळे येथील रस्त्यावरून अवजड वाहने नको   

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

कवळे - खडपाबांध रस्त्यावरून
अवजड वाहनांना परवानगी नको
मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांची मागणी

पणजी: कवळे व सभोवती भागातील कवळे - खडपाबांध रस्त्याचा वापर अवजड वाहनांसाठी केला जात असल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनांना परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी शून्य तासावेळी केली. यामध्ये सरकारतर्फे लक्ष घातले जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिले.

कवळे ते खडपाबांध रस्त्यासाठी सरकारने भू - संपादन केलेले आहे, तरी दक्षिण गोवा पीडीए व फोंडा पालिकेने एकत्रित येऊन या जागेवर इमारती बांधण्यास परवानगी दिली. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहने वाहतूक करतात.या रस्त्यावरून हलक्या वाहनांची वाहतूक होण्यास हरकत नाही.मात्र, अवजड वाहने नकोत.या रस्‍त्यासाठी भू-संपादन केलेल्या जागेत बांधकामे उभी राहत असल्याने तेथील स्थानिक लोकांमध्ये संताप असून ते आंदोलनाच्या तयारीत आहेत, असे आमदार ढवळीकर यांनी सभागृहाला सांगितले.यावेळी बांधकाममंत्री दीपक पावस्कर यांनी जसे भू-संपादन झाले आहे, त्यानुसार हा रस्ता पुढे जात आहे, असे उत्तर दिले.मात्र, त्याने समाधान न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत सरकारने त्याची दखल घेतली आहे व सरकारी जमिनीत बांधकामे केली त्याची तपासणी केली जाईल, असे सांगितले.

 

 

 

 

 

 

संबंधित बातम्या