अगोदर दुकाने थाटली, नंतर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी..!

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

आज सकाळी पोलिस अधिकाऱ्यांनी सकाळी महापालिकेच्या मार्केटमधील दुकाने बंद केली. मार्केटच्या बाहेरील बाजूला तोंड करून घाऊक व्यापाऱ्यांची असलेली दुकाने उघडली होती, तीही बंद केली खरी पण पुन्हा अकराच्यानंतर ती उघडण्यात आली होती.

पणजी, 

आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच महापालिकेने आज आयनॉक्सच्या मागील रस्त्यावर भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली. दुपारी महापालिकेने परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. रस्ता अडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते, याचा विसर कदाचित महापालिकेला पडला असावा.
टाळेबंदीच्या काळात शिथील झालेल्या नियमानुसार स्थानिक भाजीपाला व फळ विक्रेत्यांची सोय व्हावी म्हणून महापालिकेने मार्केटच्या बाहेर भाजीपाला व फळविक्रेत्यांची सोय करण्याचे ठरविले. त्यानुसार सोमवारी महापौर उदय मडकईकर आणि आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी आयनॉक्सच्या मागील रस्त्याची पाहणी करून जागेची साफसफाई करून घेतली. त्यानंतर दुकानांची आखणी करून झाल्यानंतर आजपासून विक्रेत्यांना आपले साहित्य विक्रीसाठी सुरुवात करून दिली. सकाळी अत्यंत कमी लोकांनी गर्दी केली होती. अनेकांना घराबाहेर पडावे की नको, असा प्रश्‍न निर्माण झाल्याने मोठ्‍याप्रमाणात लोकांची गर्दी दिसली नाही.
दरम्यान, आज सकाळी पोलिस अधिकाऱ्यांनी सकाळी महापालिकेच्या मार्केटमधील दुकाने बंद केली. मार्केटच्या बाहेरील बाजूला तोंड करून घाऊक व्यापाऱ्यांची असलेली दुकाने उघडली होती, तीही बंद केली खरी पण पुन्हा अकराच्यानंतर ती उघडण्यात आली होती. महापालिकेने ज्या दुकानदारांकडून पाचशे रुपये घेतलेत अशा सर्व दुकानदारांना ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. सुमारे २४ दुकानदारांनी दुकाने उघडण्यासाठी महापालिकेकडे पाचशे रुपयांची रितसर पावती भरली होती, पण महापौरांनी ही रक्कम परत करणार असल्याचे सांगितले. कारण या पावत्यांवरून समाजमाध्यमांतून महापालिकेच्या कारभारावर टीका होत होती.

संबंधित बातम्या