मायकल लोबो यांनी पेडण्यात नाक खुपसू नये

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

लोबो यांनी पेडण्याची काळजी न करता त्यांना कळंगुटकडेच लक्ष देण्यास सांगावे असे त्याना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना बजावावे असे आजगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे.

पणजी

ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी पेडण्यात काय चालते, काय चालत नाही यात नाक खुपसण्याची जरुरी नाही. कळंगुटमध्ये काय चालते याची आम्ही वाच्यता केली तर लोबो यांना पळताभुई थोडी होईल, असा इशारा पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी आज दिला. त्यांनी लोबो यांनी पेडण्याची काळजी न करता त्यांना कळंगुटकडेच लक्ष देण्यास सांगावे असे त्याना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना बजावावे असे आजगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे.
लोबो यांच्या मतदारसंघातील पर्रा येथील बांधकामाला रेती न मिळण्यावरून पेडण्याचे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्यावर टीका केली होती. त्यांना पर्यटनमंत्री आजगावकर संरक्षण देतात असे लोबो यांचे म्हणणे होते. त्याला आक्षेप घेताना आजगावकर म्हणाले, पेडण्यात असलेल्या प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याच्या मागे पालकमंत्री म्हणून मी उभे रहायचे नाही तर कोणी रहायचे. लोबो यांना अधिकाऱ्यांविषयी काही तक्रार असल्यास त्यांनी ती मुख्यमंत्र्यांकडे करायला हवी होती. जाहीरपणे कोणत्याही अधिकाऱ्याचे मानसिक खच्चीकरण करणे योग्य नाही. बरे अधिकाऱ्यांना माझा पाठींबा असे म्हणणे म्हणजे लोबो यांची हद्द झाली. अधिकाऱ्यांच्या कोणत्याही व्यवहारात मला ओढून लोबो यांना काय मिळवायचे आहे ते मला समजत नाही.
लोबो यांच्या या आगळीकीबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना दिल्याचे सांगून ते म्हणाले, कळंगुटमध्ये देहविक्रयातील महिलांची मोठ्या प्रमाणावर सुटका होते. अमली पदार्थही मोठ्या प्रमाणावर जप्त होतात. याचा पर्यटनाला बट्टा लागतो असे पर्यटनमंत्री म्हणून मी कधी बोललो नाही. आम्ही मंत्री म्हणून पूर्ण राज्याचे असतो ते लोबो यांनी ध्यानात घ्यायला हवे. मी पूर्ण राज्याचा पर्यटनमंत्री आहे, त्यामुळे पेडण्याच्या अधिकाऱ्यांना मी पाठीशी घालतो असे सांगत मी पेडण्यापुरता मर्यादीत आहे असे भासवण्याचा लोबो यांनी प्रयत्न करू नये. मी कधी कळंगुटविषयी बोललो नाही, तसे बोलण्यास मला त्यांनी भाग पाडू नये.

 

संबंधित बातम्या