लेखापालाच्या बदलीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारास विलंब?

Dainik Gomantak
मंगळवार, 14 एप्रिल 2020

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनामुळे लागू झालेल्या संचारबंदी आणि टाळेबंदीवेळी कर्मचारी हजर होते की नव्हते याविषयी महिना अखेरपर्यंतची हजेरी नोंद न झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन १४ दिवस लांबवणीवर पडले आहे.

पणजी,

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनामुळे लागू झालेल्या संचारबंदी आणि टाळेबंदीवेळी कर्मचारी हजर होते की नव्हते याविषयी महिना अखेरपर्यंतची हजेरी नोंद न झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन १४ दिवस लांबवणीवर पडले आहे. प्राप्त माहितीनुसार लेखापालाची झालेली बदलीही त्याला कारणीभूत आहे. दरम्यान, आयुक्तांनी उद्या, बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होईल, असे सांगितले.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरावढ्यात देशभर संचारबंदी लागू झाली. तीन दिवसांच्या संचारबंदीनंतर टाळेबंदी लागू झाली. मिळालेल्या माहितीनुसार संचारबंदीपासून महापालिकेचे काहीच कर्मचारी कामावर हजर राहत होते, तर काहीजण कामावर येत नव्हते. परंतु त्याचा परिणाम म्हणजे या दिवसांतील हजेरी नोंदीत झाली नाही. कोण कर्मचारी हजर होता, कोण नव्हता या हजेरीपटावर आलेच नाही, त्यामुळे कोणाचा पगार कपात करायचा आणि कोणाचा नाही, हे नोंदले गेले नाही. या दरम्यान लेखापाल म्हणून पुन्हा बदलून आलेले आर्लेकर यांची बदली झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यात आणखी विलंब झाला. नव्या लेखापालाला बोलावून घेऊन आज दुपारी पगार काढण्याविषयी आयुक्त संजित रॉड्रिग्स आणि महापौर उदय मडकईकर यांनी दीड तास चर्चा केली. कागदोपत्री सर्व अहवाल झाल्यानंतर पगार काढण्यास उद्या, बाबासाहेब आंबडेकर जंयतीमुळे ते शक्य नाही. त्यामुळे आणखी एक दिवस कर्मचाऱ्यांचा पगार लांबणीवर पडणार आहे. त्यात काही कंत्राटदार कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
एप्रिल महिन्याची १३ तारीख आली तरी कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही, त्यातच अगोदरच तीन दिवसांच्या सर्वेक्षणाला जोडल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, सर्वेक्षणात असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याने आपले दुःख कथन केले. 

संबंधित बातम्या