रेती काढणाऱ्यांविरोधात कडक कारवाई  

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पणजी: नैसर्गिक संपत्ती चोरीचा गुन्‍हा नोंदवणार : मुख्‍यसचिवांचे खातेप्रमुखांना आदेश

पणजी: नैसर्गिक संपत्ती चोरीचा गुन्‍हा नोंदवणार : मुख्‍यसचिवांचे खातेप्रमुखांना आदेश
राज्यभरात कुठेही बेकायदा रेती काढण्याचा प्रयत्न केला,तर त्‍यांच्‍याविरुद्ध नैसर्गिक संपत्तीची चोरी केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल होणार आहे.यापूर्वी खाण खनिज कायद्यानुसार कारवाई होऊन केवळ दंडावर निभावत होते. आता त्याप्रकरणी अटकही केली जाणार आहे.राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी विविध खातेप्रमुखांची आज परिषद सभागृहात संयुक्त बैठक घेत असे आदेश जारी केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बेकायदा रेती व्यवसाय बंद करण्यास राज्य सरकारला आलेल्या अपयशावर कडक शब्दांत टिप्पणी केली होती.याप्रकरणी राज्य प्रशासनाचा प्रमुख म्हणून आपल्याला आता न्यायालय जबाबदार धरेल, याची पुरेशी कल्पना आल्याने मुख्य सचिव या प्रकरणात कमालीचे सक्रिय झाले आणि त्यांनी विविध खात्यांची बैठक घेतली. त्यात कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले.

काय ठरले बैठकीत
बैठकीला दोन्ही जिल्हाधिकारी, दोन्ही पोलिस अधीक्षक, खाण संचालक, पर्यावरण संचालक, वाहतूक संचालक, बंदर कप्तान खात्यातील उपकप्तान असे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ठरवण्यात आले की, वाहतूक खात्याने बेकायदा खनिज वाहतूक करणारे वाहन दिसले की ते तत्काळ जप्त करावे. त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करून वाहन सोडले जाऊ नये. ते न्यायालयात खटला दाखल करून तेथे सादर करावे. त्याशिवाय वाहतूक अधिकाऱ्यांनी अशी वाहने पकडण्यासाठी नियमित गस्त घालावी.त्या परिसरात रेती काढली जाते अशी माहिती आहे, त्या भागात वाहतूक अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा वळवावा,असा आदेश मुख्य सचिवांनी दिला.

"गोळावळीतील कुटुंबाला मुख्यमंत्री निधीतून मदत

बीट पोलिस, तलाठ्यांनाही सतर्कतेचे निर्देश
बेकायदा रेती काढण्यात येणाऱ्या संभाव्य ठिकाणी बीट पोलिस व तलाठी यांनी लक्ष ठेवावे. तसा कोणताही प्रकार आढळल्यास तत्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. कोणावरही दंडात्मक कारवाई करून सोडू नये. त्याशिवाय नजीकच्या पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात नैसर्गिक संपत्तीची चोरी केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात यावा.या साऱ्या कारवाईचा, कार्यवाहीचा अहवाल दर १५ दिवसांनी मुख्य सचिव कार्यालयाला सादर करण्यात यावा. जप्त केलेली रेती नदीत फेकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने यंत्रसामग्री उपलब्ध करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

"विर्नोडा येथे महामार्गाचे काम बंद"
संपर्क साधण्‍याचे आवाहन
बेकायदा रेती कोणत्याही भागात काढली जात असल्यास उत्तर गोव्यातून ०८३२-२२२५३८३/२२२५०८३ आणि दक्षिण गोव्यातून ०८३२- २७९४१०० किंवा १०० क्रमांकावर नागरीकांना संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती या बैठकीत खाण संचालक आशुतोष आपटे यांनी दिली.

संबंधित बातम्या