खेळातही करिअर असल्याने पालकांचेही प्रोत्साहन

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

मुख्यमंत्री डॉ. सावंत : ‘ऑलिम्पिक डाऊन दी एजेस २०२०’चे उद्‌घाटन

‘ऑलिम्पिक डाऊन दी एजेस २०२०’चे दीपप्रज्वलन करून प्रारंभ करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत. बाजूला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू वरूण साहनी, कुलसचिव वाय. व्ही. रेड्डी, श्रीनिवास धेंपे, प्रदीप देशमुख, प्राचार्य राधिका नायक, पी. चनप्पा रेड्डी व इतर मान्यवर.

पणजी : पूर्वी खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कोणतेही करिअर नसल्यासारखा होता. पण आता खेळामध्ये करिअर घडू शकते, आता पालकही मुलांना खेळाकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहेत. खेळामुळे शारीरिक तथा सर्वांगीण विकास घडतो, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

एस.एस. धेंपो वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय आणि साखळी येथील सरकारी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शारीरिक शिक्षण आणि संबंधित विज्ञानांवर वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय संमेलन तथा ‘ऑलिम्पिक डाऊन दी एजेस २०२०’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. कुजिरा येथे तीन दिवस हे संमेलन चालणार आहे. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू वरून साहनी, ऑलिम्पिक गोल्ड क्विस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेन रास्किन्हा, धेंपो चॅरिटी ट्रस्टचे चेअरमन श्रीनिवास धेंपो, विद्यापीठाचे कुलसचिव वाय. व्ही. रेड्डी, पी. चनाप्पा रेड्डी, प्रदीप देशमुख, प्राचार्य राधिका नायक, प्राचार्य डॉ. जी.एस.पी.एल. मेंडिस यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया ही मोहीम चालविली आणि त्याचे अनुकरण अमेरिकेत झाले. फिट इंडिया राहायचा झाल्यास खेळाकडे आणि व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे. खेळामुळे सर्वांगीण विकास घडतो, वैद्यकीय पेशा असलेल्या लोकांनाही क्रीडा क्षेत्रात आठ ते दहा ठिकाणी काम करण्याची संधी मिळत आहे. काही वर्षांपूर्वी खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन म्हणजे मुलगा बिघडण्यासारखे किंवा वाया गेल्यासारखा होता. पण आता खेळातही करिअर घडते, याची जाणीव झाली आहे, त्यामुळे पालक स्वतःहून मुलांना खेळाकडे नेण्यासाठी पुढे येत आहेत किंवा लक्ष केंद्रीत करीत आहेत. खेळाडू असल्यास त्याला राष्ट्रीय नव्हेतर आंतरराष्ट्रीयस्तरावर सन्मान मिळतो आहे.

ते पुढे म्हणाले की, गोवासुद्धा खेळात प्रगती साधत आहे. धेंपो ग्रुपचे चेअरमन हे स्वतः फुटबॉल क्लबचे मालक आहेत. खेळाडूंनाही नोकऱ्यांमध्ये राखीव कोटा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. गोव्यात २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत, या स्पर्धांसाठी आपणास उपस्थित राहण्याचे निमंत्रण आपण देत असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रीपाद नाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा जागतिक स्तरावर नेला. योगाला नवी ओळख देण्याचे आव्हान त्यांनी पूर्ण केले. ऑलिम्पिक स्पर्धा ही खेळाडूंसाठी प्रोत्साहित करीत असते, गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला असून, ती स्पर्धा यावर्षी होत असल्याबद्दल अभिमान आहे. या संमेलनात ४०० प्रतिनिधी सहभागी झाले असून, या संमेलनातून सकारात्मक बाबी पुढे येतील, असेही त्यांनी नमूद केले. कुलगुरू साहनी यांनी खेळ जीवनात काय बदल घडवून आणतो, याविषयी विवेंचन केले.

श्रीनिवास धेंपे यांनी ‘ऑलिम्पिक डाऊन दी एजेस २०२०’ आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा स्वतःचा दृष्टिकोन काय, याविषयी थोडक्यात त्यांनी मत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. याशिवाय याप्रसंगी संमेलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

संबंधित बातम्या